शेतकऱ्यांना कृषीपंप व विद्युत जोडणी देण्याचे काम प्राधान्याने – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांना नवीन कृषीपंप आणि विद्युत जोडणी देण्याचे काम प्राधान्याने सुरु आहे. यात पहिल्या टप्प्यात पैसे भरून प्रलंबित असलेल्या जोडण्या मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विदर्भातील शेतकऱ्यांना कृषीपंप मिळण्यास विलंब होत असल्याबाबत सदस्य प्रवीण दटके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ग्राहकांना अखंडीत, दर्जेदार, विश्वसनीय व परवडणारा वीज पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाने “सुधारित वितरण क्षेत्र योजना- सुधारणा अधिष्ठित आणि निष्पत्ती आधारित योजना (RDSS) हा कालबध्द कार्यक्रम राबविण्याचे जाहीर केले आहे. या योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने ३९ हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. राज्यात शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्याच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

प्रधानमंत्री ‘कुसुम’ योजनेच्या अ, ब, क मध्ये काम सुरु असून ५ लाख शेतकऱ्यांना सौरपंप देण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. राज्यात फिडर सोलरायझेशनला गती देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी ही योजना आहे. सौर प्रकल्पासाठी जमीन भाडेपट्टीवर देऊन उत्पन्न मिळवून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com