नवी दिल्ली :- भारतीय लष्कराने आज ‘तंत्रज्ञान समावेशी वर्ष- सैनिकांचे सक्षमीकरण’ या संकल्पनेवर आधारित एक परिषद आणि प्रदर्शन आयोजित केले होते. माणेकशॉ सेंटर येथे भारतीय लष्कराच्या वतीने सेंटर फॉर लँड वॉरफेअर स्टडीज (CLAWS) द्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या परिषदेत तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ आणि उद्योग व्यावसायिक एकत्र आले आणि त्यांनी लष्करी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत हार्डवेअर यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर विचारमंथन केले. लष्करामध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी सुरु असलेल्या उपक्रमांना गती देण्यासाठी शिक्षण तज्ञ आणि संरक्षण उद्योगासाठी सहयोगी वातावरण निर्माण करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या उद्घाटनपर भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन संचालक डॉ चिंतन वैष्णव यांनी बीज भाषण केले. त्यानंतर भारताची संरक्षण क्षेत्राची प्रगती आणि क्षमता प्रदर्शित करणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
लष्कर प्रमुखांनी स्वदेशी संशोधन आणि विकासाद्वारे अती महत्वाच्या तंत्रज्ञानामध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करण्याची गरज अधोरेखित केली. तंत्रज्ञान हे स्पर्धेचे नवीन धोरणात्मक क्षेत्र म्हणून उदयाला आले असून, ते भू-राजकीय बळ सिद्ध करण्याला चालना देते, यावर त्यांनी भर दिला. माहितीपासून, ते पुरवठा साखळीपर्यंत विविध क्षेत्रांच्या सज्जतेसाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. अलीकडील संघर्षांचा संदर्भ देत, त्यांनी नमूद केले की तंत्रज्ञानाचा विनाशकारी आणि दुहेरी वापर अभूतपूर्व प्रमाणात होत असल्याने आधुनिक युद्धांचे स्वरूप बदलत आहे.
लष्कर प्रमुखांनी आधुनिक, तत्पर, कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या आणि तंत्रज्ञान सक्षम, भविष्यासाठी सज्ज सैन्य दलामध्ये परिवर्तित होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवण्याच्या भारतीय लष्कराच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.सर्व भागधारक, सेवा, उद्योग क्षेत्रातील भागीदार, स्टार्ट-अप, संशोधन आणि विकास संस्था, शिक्षण तज्ञ आणि धोरण कर्त्यांनी एक गतिशील राष्ट्रीय संरक्षण परिसंस्था विकसित करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असे त्यांनी आवाहन केले.
परिषद तीन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती.