वीज यंत्रणेजवळ कचरा जाळू नका; महावितरणचे नागरिकांना आवाहन

नागपूर :- वीज वाहिन्या, वितरण रोहीत्र, फीडर पीलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामूळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच विज वितरण कंपनीला नाहक मन:स्ताप सहन करावा लागत असल्याने वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पिलर, वितरण रोहित्र, वितरण पेटी किंवा डी.पी. अशा वीज यंत्रणेजवळील उघडयावर असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. वीज यंत्रणेजवळ साठवलेला हा कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यायाने संबंधीत परिसरातील वीजपुरवठाही खंडित झालेला आहे. दिवसेंदिवस ऊनाचा पारा वाढत असल्याने कच-यास आग लागण्याचे प्रकार वाढत आहेत.

वीज यंत्रणा उन्हामुळे तापलेली असल्याने अशातच अश्या आगीमुळे वीजवितरण यंत्रणेचे तापमान वाढल्यास यंत्रणेला त्याचा फटका बसतो. उपरी वीजवाहिन्याखाली असलेल्या कच-याचा ढीग पेटल्यामुळे किंवा त्याला आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका अधिक आहे. नागरिकांनी उघडयावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीज यंत्रणेला आग लागल्याचे आढळल्यास 1912 किंवा 19120, 1800-212-3435 आणि 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकांवर किंवा नजिकच्या महावितरण कार्यालयाला त्याची सुचना देण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पंपाच्या ऑटो स्टार्टर मधील स्फ़ोटाने घराला आग

नरेंद्रनगर भागातील बोरकुटे लेआऊट येथील लक्ष्मीकांत पोच्छी यांच्या घरी बुधवारी पहाटेच्या सुमारास पंपाच्या ऑटो स्टार्टरमध्ये स्फोट झाल्याने लाकडी कार्डबोर्ड व इतर साहित्याने पेट घेतला. यामुळे संपूर्ण वायरिंग व महावितरणचे वीज मीटर जळाले. अश्या घटना टाळण्यासाठी ऑटो स्टार्टरच्या जोडणीची नियमित तपासणी करण्याचे आवाहन देखील महावितरणने केले आहे.

शॉर्ट सर्किटचा धोका

घरगुती विद्युत उपकरणे आणि दिवे अति गरम झाल्याने शॉर्ट सर्कीटचा धोका होऊन आग लागण्याचीही शक्यता असते. घरगुती वायरिंग किंवा नादुरुस्त स्विचेस आणि उपकरणांमुळेही शॉर्ट सर्कीट होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिकल आउटलेट्स किंवा एक्स्टेंशन कॉड ओव्हरलोड झाल्यास याशिवाय वायरिंगमध्ये कित्येक वेळी सैल जोड वा कनेक्शन असतात, कालांतराने हे जोड काबरेनाइज होतात. कधी कधी हे जोड सैल असल्यामुळे व त्याला घट्ट इन्सुलेशन न केल्यामुळे उंदीर, पाल आदी या वायर कुरतडतात व हळूहळू त्यामुळे स्पार्किंग सुरू होते व प्रसंगी शॉर्ट सर्कीट होऊन आग लागण्याची संभावना असते, अश्यावेळी प्रथम घरातील मेन स्विच बंद करावा व मगच पाणी न वापरता कार्बनडाय ऑक्साइड, कोरडी रेती यांच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करावा, त्यापूर्वी याची सूचना अग्निशमन विभागाला देण्याचे आवाहनही महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. नॅशनल इलेक्ट्रिक कोड प्रमाणे वायरिंगचे आयुष्य 20 ते 25 वर्षे असावे असे निर्देश आहेत. घरगुती वायरिंगला 20 वर्षे झाल्यावर ग्राहकाने एखाद्या मान्यताप्राप्त किंवा महाराष्ट्र शासनाचा अनुज्ञप्तीधारक विद्युत कंत्राटदाराकडून आवश्यक त्या चाचण्या करून घेत त्याच्या सुचनेनुसार वयरिंग बदलून घेण्याचे आवाहनही महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,

महावितरण, नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अभिजीत झाँ यांची नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महासचिव व प्रवक्तापदी निवड

Thu Apr 25 , 2024
नागपूर :- नागपूर शहर (जिल्हा) कॉग्रेस कमिटीचे अंतर्गत महासचिव व प्रवक्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे. झा यांच्या नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन अ.भा.काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे तथा सोनियाजी गांधी व खा.राहूल गांधी यांच्या नेतृत्वात पक्ष संघटनेला बळकट करण्यासाठी आणि पक्षाने दिलेल्या आदेशानुसार व सर्व सामान्य जनतेपर्यंत कार्यक्रम पोहचविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार अशी ग्वाही यावेळी दिली. अभिजित झाँ यांच्या भविष्यातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com