अलमट्टी धरणावर बंधारे बांधल्यास त्याचा कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात विपरीत परिणाम, कर्नाटक सरकारला तात्काळ वस्तुस्थिती कळविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास दुसऱ्या कृष्णा पाणी तंटा लवादाने कर्नाटक सरकारला परवानगी दिली आहे. मात्र, त्यावर बंधारे बांधल्यास त्याचा विपरीत परिणाम कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात होईल. ही वस्तुस्थिती तात्काळ कर्नाटक सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात येईल आणि सर्वोच्च न्यायालयात ही वस्तुस्थिती मांडण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भात सिमुलेशन मॉडेल तयार करण्याचा राज्य शासनाचा विचार सुरू आहे. या तंत्रज्ञानामुळे बंधाऱ्यांची उंची वाढली तर त्याचा परिणाम किती होईल, किती क्षेत्र पाण्याखाली जाईल, हे कळण्यास मदत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सध्या वातावरण बदलामुळे दीड दोन महिन्यांतील पाऊस केवळ पाच सात दिवसात पडतो. मोठ्या प्रमाणात हे पाणी वाहून जाते. नवीन बंधारे तयार करून हे पुराचे पाणी दुष्काळी भागात नेता येईल का, याची योजना जागतिक बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या संचालक यांच्यासोबत यासंदर्भात सकारात्मक बैठक झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यातील म्हैसाळ प्रकल्पाच्या टप्पा २ मध्ये ४२ गावांना पाणी मिळणार आहे. त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

या चर्चेत विक्रम सावंत, राहुल कुल यांनी सहभाग घेतला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com