महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने घेतला विद्यापीठातील पदभरतीचा आढावा

नागपूर :- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला भेट देऊन विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक पदभरतीचा आढावा घेतला. विद्यापीठातील सभागृहात गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजी ही बैठक पार पडली. महाराष्ट्र शासनाने २०८८ शिक्षकांची पदे महाराष्ट्रातील विद्यापीठे व महाविद्यालयांना मंजूर केली आहेत. सदर पदे तातडीने भरली जावीत म्हणून आयोगाकडून याबाबत आढावा घेतला जात आहे. शासन निर्णय ११ एप्रिल २०२२ नुसार संवर्गनिहाय आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी. त्याचा लाभ सर्व संवर्गाला व्हावा असे मत समितीतील सदस्यांनी बैठकीत व्यक्त केले.

यावेळी बैठकीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य निवृत्त न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम, डॉ. नीलिमा सरप (लखाडे), डॉ. गोविंद काळे, सहआयुक्त मुंबई मेघराज भते, नागपूर विभाग सहसंचालक संजय ठाकरे, उपकुलसचिव संजय बाहेकर, उपकुलसचिव वसीम अहमद, सह आयुक्त माविक मनोहर पोटे, कक्ष अधिकारी संजय काटपाताळ, दिनेश तिजारे उपस्थित होते.

संवर्ग निहाय आरक्षण धोरणाचा पाठपुरावा होणे हा बैठकीचा उद्देश आहे. ओ.बी.सी., व्ही.जे. एन.टी., ई.डब्ल्यु.एस. या संवर्गाला फायदा व्हावा आणि 2088 शिक्षकांची पदे महाराष्ट्रामध्ये तात्काळ भरली जावीत. महाराष्ट्रातील पदभरतीचा अनुशेष भरुन काढल्या जावा. नॅकच्या दृष्टीकोनातून त्या संस्थेचे मूल्यांकन वाढावे आणि तद्वतच या भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्याकरिता हा आढावा महत्व्त्वपूर्ण असल्याचे समिती सदस्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांमध्ये ओबीसी, व्ही.जे. एन.टी., ई.डब्ल्यु.एस. या संवर्गाला योग्य पद्धतीने न्याय मिळतो की नाही ? हे तपासणे आणि तशा शिफारसी शासनाला करणे, हे समितीचे काम आहे. हीच समितीची भूमिका असल्याचे सदस्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाद्वारे विधान भवनाच्या पटलावर सर्व विद्यापीठांचा अहवाल सादर करावयाचा असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मागासवर्ग कक्षाने अतिशय उत्तमरितीने काम केल्याची दखल घेवून प्रशंसा केली.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com