दोन ट्रॉली कचरा डंपिंग यार्डवर जाणे बंद
चंद्रपूर :- पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा येथील झाडांची पाने गळुन होणारा कचरा व ओला कचऱ्यांचे कम्पोस्टिंग करणे पंडित दीनदयाल उपाध्याय संघ यांनी सुरु केल्याने गोळा होणारा दोन ट्रॉली कचरा डंपिंग यार्डवर जाणे बंद झाले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन चंद्रपूर शहर ” स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा ” आयोजित केली गेली असुन स्पर्धेअंतर्गत, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या मार्गदर्शनात पंडित दीनदयाल उपाध्याय संघ स्वच्छतेसाठी कार्यरत आहे. या कार्याअंतर्गत पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा परिसरात ओला कचरा व झाडाची पाने गळुन कचरा निर्मिती होत असल्याचे लक्षात आले.दररोज निघणारा हा कचरा जवळपास दोन ट्रॉली होता जो मनपा स्वच्छता विभागातर्फे गोळा करून डम्पिंग यार्डवर नेला जात होता. पंडित दीनदयाल उपाध्याय संघाने यात पुढाकार घेत कचऱ्यावर कंपोस्टिंग करण्याचे निश्चितकेल्याने आता हा परिसर स्वच्छ राहण्यास मदत मिळणार आहे .
मानवी शरीराला निरोगी व सुदृढ राहण्यासाठी जशी प्रथिने, जीवनसत्वे, इत्यादींची आवश्यकता असते त्याच प्रकारे झाडांनाही वाढीसाठी, रोगांशी लढा देण्यासाठी जीवनसत्वांची गरज असते. जे त्यांना खतापासून मिळतं. खतांच्या बराच प्रकारांमधील एक प्रकार म्हणजे “कंपोस्ट”. कंपोस्ट आपण घरच्या घरी, घरात असणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून बनवू शकतो. नागरिकांनी आपल्या घरातील टाकाऊ अन्न, फळांचे साल, भाज्यांचे तुकडे, झाडांची पाने हे सर्व कचऱ्यात टाकण्यापेक्षा कम्पोस्ट करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.