चंद्रपूर :- सलग सहाव्या दिवशी समाधी वार्ड येथील गोंडकालिन पुरातन गोविंद स्वामी मंदिर परिसराची स्वच्छता करण्याचे काम योग नृत्य परीवार आझाद गार्डन संघाद्वारे सुरु असुन स्वच्छता मोहीमेत ५३ सदस्यांचा समावेश आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन चंद्रपूर शहर ” स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा ” आयोजित केली गेली असुन स्पर्धेअंतर्गत गोपाल मुंदडा यांच्या मार्गदर्शनात योग नृत्य परीवार आझाद गार्डन संघाद्वारे उल्लेखनीय काम सुरु आहे. समाधी वार्ड येथे असलेले गोविंद स्वामी मंदिर हे गोंडकालिन पुरातन मंदिर आहे. मात्र दुर्लक्षित असल्याने या गोंडकालिन पुरातन मंदिराची अवस्था चांगली नाही.
आझाद गार्डन योग नृत्य परिवाराच्या हे लक्षात येताच मंदिर परिसराची स्वच्छता करण्याचे काम योगनृत्य परिवाराने सुरु केले आहे. संघ प्रमुख मुग्धा खांडे यांच्या नेतृत्वात ५३ सदस्य दररोज काम करीत आहेत. परिसरातील लोकांचाही मोहीमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असुन मंदिराचा स्लॅब गळत असल्याने टीम सदस्यांनी निधी गोळा करून लोकसहभागातुन मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा करावयाचे ठरविले आहे.
याप्रसंगी पुनम पिसे, मयुरी हेडाऊ, मीना निखारे, रवी निखारे, बाळकृष्ण माणूसमारे, पांडे , सूरज घोडमारे, शिवानी कुलकर्णी, पिंपलकर, रंजु मोडक आणि इतर सर्व टीम मेंबर्सना होम कंपोस्टिंगचे प्रशिक्षण देण्यात आले.