मुंबई :- भारताच्या हरित क्रांतीचे जनक ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ व सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनाने भारताला अन्नधान्यात आत्मनिर्भर करणारा महान शास्त्रज्ञ हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, देशातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तांदळाच्या विविध प्रकारच्या उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजाती तयार करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करतानाही त्यांनी शेतकरी हित जपण्याचे महत्त्वाचे कार्य केले. 2004 साली स्वामीनाथन यांनी राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही केलेले कार्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे. 2006 मध्ये किमान आधारभूत किंमत (एमएसपी) बाबत त्यांनी काही शिफारसी केल्या होत्या, उत्पादन मूल्याच्या दीड पट हमीभाव देण्याच्या त्यांच्या शिफारसींची अंमलबजावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये केली. डॉ. स्वामीनाथन यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !