पाच दिवसांनी मिळाली पत्नी अन् मुलगा

-लोहमार्ग पोलिसांनी घेतला शोध

-22 मार्चच्या मध्यरात्रीची घटना

नागपूर :-मागील पाच दिवसांपासून तो पत्नी आणि मुलाच्या शोधात होता. दोन वर्षांचा मुलगा डोळ्याने दिसत नसल्याने तो कासाविस झाला होता. पोलिसांनी मोबाईल लोकेशन मिळविले. बुटीबोरी परिसरात मजुरांकडे शोध घेतला. अखेर एका तंबूत ती मुलासह आढळून आली. पत्नी आणि मुलाला पाहून त्याच्या आनंदाला पारावार नव्हता.

शिवनी येथील रहिवासी संदीप (28) हा मूर्तीला आकार देण्याचे काम करतो. तीन वर्षांपूर्वीच त्याचे लग्न यशकला (24) हिच्यासोबत सोबत झाले. त्यांच्या संसार वेलीवर गोंडस बाळ आले. दोन वर्षांचा मोक्ष संदीपच्या अगदीच लाडाचा. मूर्तीच्या कामानिमित्त संदीप पत्नीसह बंगळुरूला असतो. अलिकडेच म्हणजे होळीनंतर पती, पत्नी आपल्या गावी आले. आनंदाने सुट्या घालविल्या आणि 22 मार्चला बंगळुरूला जाण्यासाठी रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर आले. केरळ एक्सप्रेसमध्ये त्यांचे आरक्षण होते.

गाडीला वेळ असल्याने तिघेही फलाट क्रमांक 2 वर आराम करीत होते. दरम्यान संदीपला डोळा लागला. रात्री 12.30 च्या सुमारास पत्नी यशकला मुलगा मोक्षला घेऊन स्टेशन बाहेर पडली. तिकडे गाडीची वेळ होताच संदीप झोपेतून खडबडून जागा झाला. मात्र, पत्नी आणि मुलगा त्याला दिसले नाहीत. त्याने रेल्वेस्थानकावर सर्वत्र शोध घेतला. मात्र, काहीच उपयोग झाला नाही. अखेर लोहमार्ग पोलिस ठाण्यात त्याने हरविल्याची तक्रार केली.

लोहमार्ग पोलिस निरीक्षक मनीषा काशिद यांनी शोध घेण्यासाठी पथक तयार केले. पोलिस उपनिरीक्षक भलावी, पोलिस शिपाई मजहर अली आणि वंदना सोनावने यांचा समावेश होता. यशकलाने दोन दिवस मोबाईल बंदच ठेवला. मोबाईल सुरू होताच तिचे लोकेशन मिळाले. पोलिस पथक बुटीबोरी परिसरात पोहोचले. मजुरांकडे शोध घेतला. अखेर ती मजुरांच्या एका तंबूत मुलासह आढळून आली.

पोलिसांनी मुलासह तिला ठाण्यात आणले. तिची आस्थेने विचारपूस केली. भांडण आणि मारहाण करीत असल्याने असा निर्णय घेतल्याचे यशकलाने पोलिसांना सांगितले. परंतु आता पतीकडेच जायचे, असेही ती म्हणाली, तर पत्नी आणि मुलगा मिळाल्याच्या आनंदाने संदीपचे डोळे पाणावले. यापुढे भांडण करणार नाही अशी ग्वाही संदीपने दिली. एका कुटुंबाला एकत्रित आणण्याचे चांगले काम केल्याचा आनंद लोहमार्ग पोलिसांना आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com