गाडगेबाबांच्या स्मृतीभवनासाठी 25 कोटी रुपयांचा निधी

वडिलांचे स्वप्न साकार झाल्याची प्रशांत देशमुख यांची भावना

शासन-प्रशासनाचे मानले आभार

नागपूर :- अमरावती येथील गाडगेबाबांच्या समाधी मंदिरासमोरील जागेत मुंबईच्या मनी भवन या महात्मा गांधीजींच्या स्मारकाच्या धर्तीवर निष्काम कर्मयोगी गाडगेबाबांचे स्मारक व्हावे, यासाठी आपले आयुष्य पणाला लावणारे समाधी मंदिराचे तत्कालीन विश्वस्त कैलासवासी गोविंदराव अच्युतराव देशमुख यांचे स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रिया शासनाने गाडगेबाबांच्या स्मरकासाठी 25 कोटींचा निधी देत असल्याची घोषणा केल्यावर मुंबईच्या धर्मशाळा ट्रस्टचे प्रशांत देशमुख यांनी दिली आहे. यासाठी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार व खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा व अमरावती जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांचे आभार मानले आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारचा अमृत काळातील अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची घोषणा केली. त्यामध्ये निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या समाधी स्थळ समोरील जागेत स्मृती भवन बांधण्यासाठी वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 कोटी रुपयांची घोषणा केली. यासंदर्भात माहिती देताना मुंबईच्या धर्मशाळेचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांनी सांगितले की, निष्काम कर्मयोगी गाडगेबाबांचा विचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचावा. बाबांच्या दशसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, सोबतच मुंबई येथे महात्मा गांधीजी यांचे असणारे मनीभवन त्याच धर्तीवर अमरावती येथील गाडगे महाराजांच्या समाधी स्थळा समोरील जागेत बाबांचे स्मृती भवन व्हावे यासाठी गाडगेबाबा समाधी मंदिर ट्रस्टचे तत्कालीन विश्वस्त तथा अमरावतीचे माजी गटविकास अधिकारी कैलासवासी गोविंदराव अच्युतराव देशमुख यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. बाबांचे स्मृती भवन व्हावे यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शासन प्रशासनाकडे पाठपुरावा केला. हा पाठपुरावा करत असतानाच 2007 साली अमरावती येथीलल समाधी मंदिरावर त्यांचे निधन झाले. मात्र हाच वारसा पुढे नेत सरकारने बाबांच्या स्मारकासाठी भरघोस असा निधी दिला. त्यासाठी प्रशांत देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा तसेच अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण लोकप्रतिनिधी, शासन-प्रशासन व गाडगेबाबांचा विचार पुढे घेऊन जाणारे त्यांचे अनुयायी यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com