राज्यपालांच्या हस्ते साहित्य, कला, संस्कृती, समाज कार्य क्षेत्रातील वाग्धारा सन्मान प्रदान

– नवी पिढी हिंदी, मराठी लिहू – वाचू शकत नाही ही चिंतेची बाब’: राज्यपाल रमेश बैस

मुंबई :- भाषा व साहित्य विभिन्न संस्कृती व दृष्टिकोन समजण्यास मदत करतात, तसेच विचारशीलता, ज्ञान व स्नेहभाव वृद्धिंगत करतात. मात्र आज वाचन संस्कृती लोप पावत आहे. दिवसेंदिवस नवी पिढी मराठी, हिंदी व इतर प्रादेशिक भाषा लिहिण्यास व वाचण्यास असमर्थ होत आहे ही चिंतेची बाब आहे. हे चित्र बदलून आपल्या भाषांप्रती नव्या पिढीमध्ये अभिमान जगविण्यासाठी घरोघरी मातृभाषेतच बोलले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.   

साहित्य, संस्कृती, शिक्षण, कला व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील ४८ व्यक्तींना गुरुवारी (दि. १८) राज्यपाल बैस यांच्या हस्ते ‘वाग्धारा नवरत्न’, ‘स्वयंसिद्ध’, ‘यंग अचिव्हर्स’ व जीवन गौरव सन्मान मुक्ती सभागृह अंधेरी मुंबई येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

इंग्रजी भाषा अवश्य शिकली पाहिजे. त्याही पलीकडे जर्मन, फ्रेंच, मँडरिन या भाषा देखील शिकाव्या. परंतु मातृभाषेची उपेक्षा करुन विकसित भारताचे लक्ष गाठता येणार नाही असे राज्यपालांनी सांगितले.

आज घरात चार व्यक्ती असतील तर चारही जण मोबाईलवर हरवलेले असतात. त्यामुळे संवाद हरवत चालला. केवळ मुलेच नाही तर आईवडील देखील मोबाईलवर अधिक वेळ घालवतात. व्हाट्सअप हेच जणू विद्यापीठ बनले आहे. चांगली व्यक्ती होण्यासाठी उत्तम वाचनाला पर्याय नाही, यास्तव वाचन संस्कृतीला चालना द्यावी लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.

ज्येष्ठ साहित्यिक नंदलाल पाठक यांना ‘वाग्धारा जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्तीसगड येथील प्रसिद्ध पांडवाणी गायिका रितू वर्मा तसेच तर ज्येष्ठ पत्रकार राजेश बादल यांना ‘वाग्धारा नवरत्न’ सन्मान देण्यात आला. पत्रकार व संपादक नरेंद्र कोठेकर, अभिनेत्री सीमा बिस्वास यांसह इतरांना ‘वाग्धारा’ स्वयंसिद्ध पुरस्कार देण्यात आला.   

यावेळी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष जयंत देशमुख, ‘वाग्धारा’चे अध्यक्ष डॉ वागीश सारस्वत, कार्यकारी अध्यक्ष दुर्गेश्वरी सिंह ‘महक’, ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक विमल मिश्र आदी उपस्थित होते.

सुदर्शन द्विवेदी, संगीता वाघे, मंगला वाघे, डॉ मुस्तफा युसूफ अली गोम, इकबाल ममदानी, वीरेंद्र सक्सेना, डॉ राजीव मिश्रा, डॉ जीवन संखे यांना देखील यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

क्रिकेटमध्ये नागपूर-बी संघाचा विजय, खासदार क्रीडा महोत्सव : विविध स्पर्धांमध्ये दिव्यांगांनी दाखविले कौशल्य

Fri Jan 19 , 2024
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरामध्ये सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये दिव्यांग मुले व मुलींनी आपले कौशल्य दाखविले. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानात गुरूवारी (ता.18) विविध स्पर्धा घेण्यात आल्या. खुल्या वयोगटात झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये नागपूर-बी संघाने ज्ञानज्योती संघाला पराभवाचा धक्का देत विजय मिळविला. नागपूर-बी संघाचा करण सामनावीर ठरला. तर ज्ञानज्योती संघाच्या परमेश्वरला उत्कृष्ट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com