– पर्यटकांना बसण्यासाठी गॅझेबो
– मुलांसाठी विविध प्रकारच्या खेळण्या
– चालण्यासाठी पर्यावरणपूरक पायवाट
नागपूर :- पन्नास वर्षांपूर्वी नागपूर शहरात बालोद्यान हे एकमेव पर्यटनस्थळ होते. शाळा, महाविद्यालये आणि नागरिकांसाठी पिकनिक स्थळ म्हणून हे उद्यान प्रसिद्ध होते. या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असायची. कालांतराने शहराचा चेहरामोहरा बदलत गेला. नवनवीन पिकनिक स्थळे निर्माण झाली आणि बालोद्यानकडे दुर्लक्ष होत गेले. मात्र बालोद्यानचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जिल्हाधिकारी विपीन इटनकर आणि वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भरत सिंह हाडा यांनी कल्पक योजना आखली. त्यांच्या मार्गदर्शनात सार्वजनिक बांधकाम विभागाने बालोद्यानच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. या ठिकाणी रबरी मॅटवरील बुद्धिबळ आणि सापसिडी या खेळांचे आकर्षण राहणार आहे. 75 टक्के कामे पूर्ण झाली असून, एक 1 पासून बालोद्यान नागपूरकरांसाठी खुले करता येईल, अशी आशा सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित कुचेवार, उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये आणि शाखा अभियंता संदीप चाफले यांच्या देखरेखीत सचिन जैन हे बालोद्यानला नवा चेहरा देण्याचे काम करीत आहेत. जानेवारी महिन्यात कामाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रवेश करताच निसर्गाच्या सान्निध्यात असल्याचा भास करून देणारे आकर्षक प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. भल्यामोठ्या रबरी मॅटवर बुद्धिबळ आणि सापसिडीचा खेळ पाहण्यास मिळणार आहे. हे खेळ मुलांसह ज्येष्ठांनाही आकर्षित करतील. यासोबतच तीन मोठे आणि चार लहान स्वरूपातील गॅझेबो (बसण्याचे ठिकाण) तयार करण्यात आले आहेत. वर छत असलेल्या गॅझेबोमध्ये ऊन, पाऊस आणि थंडीतही कुटुंबासह बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद आणि जंगलाचा आनंद घेता येणार आहे. मुलांसाठी विविध प्रकारच्या आणि आकर्षक अशा खेळणीसुद्धा बसविण्यात आल्या आहेत. आतमध्येच खाद्यपदार्थांचे लहान-मोठे सात स्टॉल लावण्यात येत आहेत.
तीन किमीची पायवाट
जपानी गार्डन ते बालोद्यानपर्यंत तीन किमी पायवाट तयार करण्यात येत आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. पायवाट तयार करताना पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक संसाधनांवर भर देण्यात आला आहे. मुरमाचा वापर करण्यात आला असून, पावसाने वाहून जाऊ नये म्हणून फार कमी सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पायवाट तयार करताना वृक्षांना कुठेही धक्का लागणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. यासोबतच पहिल्यांदाच वॉल कंपाऊंडमध्ये चेन लिंक फेन्सिंगचा वापर करण्यात आला आहे.