– पुण्याच्या बालेवाडीत कसून सराव; तळागाळातील महिला खेळाडू गाठतील सोनेरी यशाचा पल्ला- प्रशिक्षकांचा दावा
पुणे :-महाराष्ट्र महिला गतका संघ पदार्पणात ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. गोवा येथे राष्ट्रीय स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा महिला संघ गतका खेळ प्रकारात आपले कौशल्य आणि गुणवत्ता सिद्ध करणार आहे. हा सोनेरी यशाचा बहुमान मिळवण्यासाठी महाराष्ट्र महिला संघाने पुण्यातील बालेवाडी मध्ये कसून सराव केला आहे. येत्या ३१ ऑक्टोबरपासून गतका क्रीडा प्रकाराला सुरुवात होणार आहे. यादरम्यान महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे खास लक्ष असणार आहे.
गतका या खेळासाठी राष्ट्रीय स्पर्धेसाठी सराव शिबिर १६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. २९ तारखेला संघ गोव्याला रवाना होणार आहे आणि ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान डॉक्टर बांदोडकर कंपल ग्राऊंड, पणजी येथे स्पर्धा होणार आहेत
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ११ मुलींची निवड करण्यात आली आहे या मुली गतका खेळामधील सिंगल सोटी टीममध्ये प्रगती महांगडे ( सातारा), तनया मंचेकर (रायगड), शिवानी गायकवाड (नवी मुंबई), कोमल शिंदे (पुणे), तसेच सिंगल सोटी इंडिविज्युअल मानसी पाटील (रायगड), फरीसोटी टीम श्रुती अंभोरे (परभणी), शिवानी कदम (परभणी), श्रद्धा घोडे (पुणे), अश्विनी देवकर (सोलापूर). तसेच फरीसोटी इंडिव्हिज्युअलमध्ये मिलनप्रीत कौर खोकर (ठाणे), इंडिव्हिज्युअल डेमो
सुदिक्षा शिरसागर (पुणे) यांची पाच प्रकारासाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रा. आरती चौधरी (सरचिटणीस, असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्र) यांची प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे आणि संघ व्यवस्थापकपदी प्रा. सागर कुडले यांची निवड झाली
तसेच प्रा. सूरज गायकवाड आणि मंथन पवार ह्या राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन खेळाडूंना शिबिरामध्ये होत आहे.
कसून सरावातून उंचावला आत्मविश्वास; किताबाचा दावा मजबूत : प्रशिक्षक आरती चौधरी
महाराष्ट्र महिला संघ पहिल्यांदाच गतका खेळ प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहे. आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील या प्रकारातील महाराष्ट्राची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे. त्यामुळे निश्चितपणे आताही महाराष्ट्राचा महिला संघ सुवर्णपदकाचा दावेदार मानला जात आहे. पुण्यातील बालेवाडीत आयोजित सराव शिबिरामुळे महिला खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. सोनेरी यशाचा पल्ला गाठण्यासाठी आम्ही खास तंत्रशुद्ध पद्धतीने खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे महिला संघ या मेहनतीच्या बाळावर महाराष्ट्राला किताबाचा बहुमान मिळवून देतील, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक आरती चौधरी यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या तळागाळातील महिला खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे हेच कौशल्य आणि प्रतिभा सिद्ध करण्यासाठी महिला संघ सज्ज झाला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.