नागपूर :- महावितरणच्या आपला 20 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात नुकताच साजरा केला. यानिमित्ताने नागपूर परिमंडलाने आयोजित कार्यक्रमात नियमित व बाह्यस्रोत कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला, ज्यामुळे कार्यक्रमाला एक कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले.
नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली, वर्धापन दिनानिमित्त 1 ते 6 जून दरम्यान वीज सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. ‘शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन नागपूर व वर्धा जिल्ह्यांत व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या सप्ताहात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मॅरेथॉन, रॅली, चित्रकला व निबंध स्पर्धा, तसेच रहिवासी सोसायट्यांना भेटी देऊन वीज वितरण व वापरावेळी घ्यावयाच्या खबरदारीबाबत माहिती दिली. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता या सप्ताहाच्या केंद्रस्थानी होती.
सप्ताहाच्या समारोपाचा आणि वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम नागपूर व वर्धा येथे कर्मचारी आणि कुटुंबियांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या आयोजनाने अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351 व्या राज्यभिषेक दिनानिमित्त त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्याने झाली. त्यानंतर महावितरणच्या 20 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या चित्रफिती दाखवण्यात आल्या. यात मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांचे शुभेच्छा संदेश तसेच वीज सुरक्षेबाबत घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी, सावनेर विभागातील धापेवाडा आणि बुटीबोरी विभागातील मोहगाव, डोंगरगाव, निलडोह, आणि सोनेगाव येथील 33 केव्ही उपकेंद्रांना मिळालेल्या आयएसओ मानांकनाबद्दल संबंधित कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, वीज सुरक्षा सप्ताहादरम्यान आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्याला मुख्य अभियंता दिलीप दोडके, संचालक (ग्राहक व्यवहार) ऍड. गौरी चंद्रायण, परीक्षक आणि सुप्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत, अधीक्षक अभियंते अमित परांजपे व संजय वाकडे यांच्यासह परिमंडळातील अभियंते, अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हास्य आणि संगीताची मैफल
महावितरणचे नागपूर परिक्षेत्र, नागपूर परिमंडल, नागपूर शहर आणि ग्रामीण तसेच स्थापत्य आणि चाचणी मंडळांतर्गत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी कामठी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर येथे विशेष मनोरंजनाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध टीव्ही कलावंत जित कोष्टी यांच्या ‘हास्यरंग’ या एकपात्री विनोदी कार्यक्रमाने उपस्थितांना पोट धरून हसायला लावले. तसेच, सेवन नोट्स ऑर्केस्ट्राने सादर केलेल्या हिंदी-मराठी गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांना निखळ मनोरंजनाचा मनमुराद आनंद घेता आला.