राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाचे उद्घाटन

पुणे :- प्राथमिक आरोग्यावर भर दिल्यास विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरील ताण कमी होतो. त्यामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यादृष्टीने राज्यातील आरोग्य सेवेची पुर्नरचना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

मावळ तालुक्यातील आंबी- तरंगवाडी येथे पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबईचे अध्यक्ष तथा कुलपती डॉ. विजय पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूरचे कुलपती संजय पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबईच्या उपाध्यक्ष तथा उपकुलपती डॉ. शिवानी पाटील, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, उद्योजक रामदास काकडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासनाच्या विविध योजना नीटपणे राबविण्याचे काम विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात येते. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत करण्यात येतात. आरोग्यसेवेच्या क्षेत्रात विमा आणि सेवेची खात्री या माध्यमातून गरीब रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. राज्यात प्राथमिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासह द्वितीयस्तरीय आरोग्य सेवाही बळकट करण्यात येणार आहेत. विशेषोपचारासाठी शासकीय रुग्णालये, विद्यापीठांची आणि खाजगी रुग्णालये आहेत. आरोग्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या काही वर्षात 10 वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यात असे महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. मुलींना वैद्यकीय शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णयही शासनाने घेतला. यातून शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विस्तार आणि गुणवत्ता दिसून येत आहे. विद्यापीठाने असेच कार्य सुरू करून नवनवीन ठिकाणी रुग्णालय आणि शैक्षणिक संकुल उभे करावे. त्यामागे समाजसेवेची भूमिका असल्याने शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल.

महाराष्ट्रात शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी क्रांती आणण्याचे आणि तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात संधी मिळवून देण्याचे काम करणाऱ्यांमध्ये डॉ. डी. वाय. पाटील हे एक अग्रणी नाव असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात उच्च शिक्षणाच्या खासगीकरणामुळे डॉ.डी.वाय.पाटील आणि त्यांच्यासारख्या व्यक्तींनी संस्था उभ्या केल्या आणि उच्च शिक्षणाचा विस्तार झाला. त्यामुळे अनेकांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. राज्यात सात खासगी विद्यापीठे या कुटुंबाने सुरू केली आणि गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम सुरू केले. गुणवत्तेला धक्का न लावता उत्तम शिक्षण देण्यासाठी डी.वाय.पाटील यांच्या कुटुंबाने चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. या वाटचालीत पुष्पलता पाटील यांचे संस्कार महत्वाचे ठरले असल्याने त्यांचे नाव रुग्णालयाला देण्यात आले आहे.

पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयात अत्यंत आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या परिसराला वरदान ठरेल असे रुग्णालय उभे करण्यात आले आहे. औद्योगिक वसाहत आणि परिसरातील सामान्य माणसाला कमी खर्चात चांगले उपचार देण्यासाठी या रुग्णालयाचा फायदा होणार आहे. डॉ.विजय पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 70 खाटा आरक्षित ठेवल्या आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीने संदर्भित केलेले 12 ते 15 हजार रुग्णांवर उपचार इथे करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रास्ताविकात कुलपती डॉ.पाटील यांनी रुग्णालयाची माहिती दिली. रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या सर्व सुविधा पुरविण्यात येतील. केंद्र आणि राज्य शासनाने सुरू केलेल्या आयुष्मान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा परिसरातील नागरिकांना लाभ घेता येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांना चांगली सेवा द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

पुष्पलता डी.वाय.पाटील धर्मादाय रुग्णालय 600 खाटांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मल्टीस्पेशालिटी रुग्णालय असून येथे विविध सेवा उपलब्ध आहेत. आंबी, मावळ, तळेगाव भागातील जनतेला या रुग्णालयातून आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत. रुग्णालयाने स्वतःचा ऑक्सिजन प्रकल्प उभारला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राज्यात काल मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक 41 मिमी पाऊस

Mon Jun 9 , 2025
मुंबई :- राज्यात मागील 24 तासांमध्ये (8 जून रोजी सकाळपर्यंत ) मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक 41 मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड 20.8 मिमी, धाराशिव 13.8 मिमी, ठाणे 7.9 मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात 6.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात कालपासून आज 8 जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) : ठाणे 7.9, रायगड ,20.8, रत्नागिरी 6.7, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!