– छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांची उपस्थिती; उत्कृष्ट आयोजनासाठी केले कौतुक
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. ९) महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ‘शिवतीर्थ’ येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री विजय शर्मा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. याप्रसंगी त्यांच्यासोबत आमदार प्रवीण दटके, श्रीमंत राजे मुधोजी भोसले, युवराज जयसिंग भोसले, नागपूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, उपायुक्त विनोद जाधव, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन बघून आपण येथे रायगडावरील छत्रपती शिवजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याला आलो असल्याची भावना छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री विजय शर्मा यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांचे स्वागत केले. अजय चारठाणकर यांनी उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांचे मनपाचा मानाचा दुप्पटा व ७५ व्या अमृत महोत्सवी सन्मानचिन्ह देऊन सत्कार केले.
या सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल बघायला मिळाली. ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता, ज्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सोहळ्यानिमित्त सादर करण्यात आलेल्या शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना त्या ऐतिहासिक काळाची आठवण करून दिली. तसेच, शिवराज्याभिषेक महिला मुद्रा पथकाने केलेल्या सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली.