ह्युंदाई मोटरच्या प्रोजेक्ट H२OPE अंतर्गत गडचिरोलीतील शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी – मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक

मुंबई :- गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ह्युंदाई मोटरच्या ‘प्रोजेक्ट H२OPE’ (होप) उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे.

गडचिरोली या आकांक्षित जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून उपक्रम राबविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस होता. त्यांच्या दूरदृष्टीतून आलेल्या या आवाहनाला ह्युंदाईने प्रतिसाद दिला आणि त्यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमांतर्गत 250 शाळांमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सामाजिक कल्याण व सामुदायिक विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या पुढाकाराचे अभिनंदन करीत या उपक्रमाचा अधिक विस्तार व्हावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

दोन टप्प्यांमध्ये राबविलेल्या या उपक्रमांतर्गत मागील वर्षी पहिल्या टप्प्यात 100 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात यावर्षी अहेरी मध्ये 35, भामरागड मध्ये 14, धानोरा मध्ये 32, एटापल्ली मध्ये 39, कोरची मध्ये 14 तर मुलचेरा मध्ये 16 अशा एकूण 150 शाळांमध्ये ही सुविधा मिळाली आहे. यामधून एकूण 26,341 विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्वच्छ पाण्यामुळे त्यांचे आरोग्य आणि शिक्षण यामध्ये सकारात्मक सुधारणा होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड ही एक आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी असून, ती शाश्वत विकासासाठी बांधिल आहे. या कंपनीने जलसंवर्धनासाठी ‘Project H२OPE अंतर्गत सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या सुविधा वाढवणे’ ही उपक्रमात्मक योजना गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये राबवली आहे. हा उपक्रम ग्रामीण भागातील शासकीय शाळांमध्ये स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 250 शाळांमध्ये हा प्रकल्प राबवला गेला असून, त्याचा हजारो विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 100 शाळा आणि दुसऱ्या टप्प्यात 150 शाळांची निवड करण्यात आली. या शाळांमध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस (RO) युनिट्स, जलशीतक, सबमर्सिबल पंप, बोअरवेल्स आणि सहा थरांची साठवण टाकी बसवण्यात आली आहे. त्याचबरोबर जलसंवर्धन आणि स्वच्छतेबाबत जागरुकता सत्रे घेण्यात आली. ह्युंदाईने सीएसव्ही (CSV) धोरणांतर्गत या प्रकल्पासाठी एकूण 5.5 कोटींची गुंतवणूक केल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जिल्ह्यातील ५० शिवप्रेमी ‘भारत गौरव यात्रा’साठी रवाना; छत्रपती शिवाजी महाराज सर्किटमध्ये होणार सहभागी

Mon Jun 9 , 2025
गडचिरोली :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा गौरव करणाऱ्या ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ उपक्रमांतर्गत आय.आर.सी.टी.सी. व महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने सुरु होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट यात्रेत गडचिरोली जिल्ह्यातून निवडण्यात आलेले ५० शिवप्रेमी, युवक, विद्यार्थी व इतिहास प्रेमी आज मुंबईकडे रवाना झाले. या गौरवशाली यात्रेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवी झेंडी दाखवून ट्रॅव्हल्सद्वारे नागपूर व तेथून रेल्वेने मुंबईला रवाना करण्यात आले. या यात्रेचा उद्देश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!