– सायंकाळचे एसटीत दिसते खचाखच गर्दी
बेला :- जिल्हा व उमरेड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असणारे बेला गाव ‘ महत्त्वपूर्ण व मोठे ‘ आहे. येथून वर्धा,हिंगणघाट, उमरेड व नागपूरला जाण्यासाठी प्रवाशांची फार मोठी वर्दळ,वाहतूक असते. पण,परिवहन मंडळाच्या बसेसचा तोटा दिसून येतो. त्यामुळे वृद्ध, स्त्री, पुरुष, महाविद्यालयीन विद्यार्थी व दैनंदिन ये,जा करणाऱ्या प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे. सध्याचा प्रवासी निवारा अपुरा व तुटपुंजा ठरत असल्याने येथे नवीन अत्याधुनिक बसस्थानक बांधण्यात यावे.अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयासह लहान मोठ्या अनेक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय,मोठी बाजारपेठ, पोलीस स्टेशन, अप्पर तहसील कार्यालय, वडगाव व नांद जलाशय, ३ बँक, ४०-५० खेडेगावांचा दैनंदिन संपर्क लक्षात घेता बेला येथून नागपूर,वर्धा,सेलू, सिंदी (रेल्वे), गिरड, सिर्सी,नांद, भिवापूर, उमरेड,जाम,समुद्रपूर, बुटीबोरी,हिंगणघाटला दर दिवशी प्रवाशांची मोठी वर्दळ वाहतूक सुरू असते.समुद्रपूरला शिक्षणासाठी जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सकाळची बेला- हिंगणघाट बस सेवा हिंगणघाट आगाराने बंद केली. हि बसफेरी पौनी कुर्ला उमरी रामनगर महागाव व अनेक खेड्यापाड्यातील नागरिकांसाठी सोयीस्कर होती. नागपूर बेला नागपुर ही बेला येथे सकाळी ९ वा. येणारी बस बंद करण्यात आली.बेला येथून नागपूर साठी दुपारी १२.३० वा. बस आहे. त्यानंतर ३ वाजेपर्यंत बसफेरी नाही.तसेच नागपूर गणेशपेठचे मध्यवर्ती बसस्थानकामधून बेला येथे जाण्यासाठी सायंकाळी ४ वाजेनंतर बसेसची कमतरता दिसून येते. बस उपलब्ध नसल्यामुळे सायंकाळी ५ वा.दरम्यान नागपूरहून सुटणाऱ्या बस मध्ये प्रवाशांची खचाखच गर्दी पहायला मिळते. यावेळी मार्गावर दोनशे पेक्षा जास्त प्रवासी असतात. त्यामुळे जवळपास शंभरावर प्रवाशांना बेला येथे येण्यासाठी ताटकळत बसावे लागते. ते रात्री उशिरा पोहोचतात.या गैरसोयी संदर्भात त्रस्त प्रवाशांनी सहा महिन्यापूर्वीला विभागीय वाहतूक अधिकारी श्रीकांत गभणे यांना लेखी विनंती अर्ज दिल्याचे दररोज प्रवास करणारा अपंग प्रवासी रामदास चिंचुलकर यांनी सांगून दखल घेतली नसल्याची खंत व्यक्त केली.
सोनेगावला जलद बस थांबवा
बेला येथून ६ कि.मी.अंतरावर नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग असून त्यावर सोनेगाव (लोधी) गाव आहे. बेला येथे येणारी नागपूर बसफेरी त्याच मार्गाने ये जा करते. या महामार्गावरून चंद्रपूर,वणी,पांढरकवडा व इमामवाडा आगाराची हिंगणघाट जलद बस जाते. त्यांना सोनेगाव (लोधी) येथे थांबण्याचा आदेश दिल्यास ते बेला भागातील प्रवाशांची होणारी गैरसोय संपवेल.मात्र याकडे वरिष्ठ वाहतूक अधिकारी दुर्लक्ष करीत आहे.
निशानघाट मुक्कामी बससेवा पाहिजे
सात आठ वर्षांपूर्वी नागपूर बेला निशानघाट मुक्कामी बसफेरी होती. ती बंद करण्यात आली. बेला येथून १० कि.मी अंतरावर दुर्गम भागातील आदिवासीबहुल निशानघाट खेडेगाव आहे. बस सेवा नसल्याने मुरादपूर, कवडापूर, खूर्सापार, निशानघाटच्या नागरिकांना बुटीबोरी हिंगणघाट वर्धा,नागपूरला जाण्यासाठी बेलापर्यंत पायपीट करावी लागते. त्यामुळे जुनी निशानघाट बेला नागपूर मुक्कामी बसफेरी चालू करावी. अशी मागणी आहे.
प्रतिक्रिया – वृद्ध,जेष्ठ नागरिकांसाठी परिवहन मंडळाच्या एसटी बसमध्ये सवलत असते. शिवाय, एसटीचा प्रवास सुरक्षित असतो. त्यामुळे बहुतांश ज्येष्ठ नागरिक व महिला बसनेच प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र बेला येथून नागपूर हिंगणघाट व वर्धासाठी एसटी बसची वाणवा आहे.
नामदेव लामपुसे,ज्येष्ठ नागरिक बेला
प्रतिक्रिया – संबंधित चालक,वाहक व अधिकाऱ्यांनी याबाबत मला सांगितले नाही. प्रवाशांच्या गैरसोयीबाबत उपाययोजनात्मक कारवाई केल्या जाईल. लवकरच नवीन बसफेरी सुरू केली जाईल.
श्रीकांत गभणे,विभागीय वाहतूक अधिकारी
परिवहन महामंडळ नागपूर
शनिवारी बसस्टॅन्डवर भरतो बाजार
बेल्याला शनिवारी बाजार भरतो. पुरेशी जागा नसल्यामुळे बस स्टँडच्या मोकळ्या जागेत दुकाने लागतात. त्यामुळे अर्धा कि.मी.दूरवर माऊली सभागृहापुढे बस थांबा जातो ते प्रवाशांसाठी खूप त्रासदायक ठरत आहे.