रामटेक परीसरात उरला नाही ‘ खाकीचा धाक ‘
रामटेक परीसरात खाकीचा धाक ओसरला
– नागरीकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
– नगदी रोकड, दागीने, दुचाकींसह सायकलींवर चोरट्यांचा हात साफ
– चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ
रामटेक :-रामटेक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. कुठे घरफोडी करून नकद, दागीन्यांवर हात साफ करणे, दुकानांसमोरून दुचाकी चोरून नेणे तर दिवसाढवळ्या घरासमोरुन सायकल चोरून नेणे अशाप्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. परिणामस्वरूप स्थानिक पोलिस प्रशाषणासारखे सुरक्षा रक्षक असुनही नागरीकांच्या मालमत्तेच्या सुरक्षीततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
उल्लेखनिय म्हणजे शहराला लागुनच असलेल्या शितलवाडी परीसरात तर चोरट्यांनी जणु चोरीचा सपाटाच सुरु केलेला आहे. घरी कुणी नसल्याचे पाहने व तेथे घर फोडुन आतील मालमत्तेवर हात साफ करणे अशा कित्येक घटना या भागात सातत्याने घडत असतात. नुकत्याच २५ डिसेंबर ला याच भागातील सुनील पानतावणे हे टाकळघाटला दर्शनासाठी गेले असता घरी कुणी नसल्याचे पाहुन चोरट्यांनी कुलुप व कुंडी तोडुन आत प्रवेश करीत ६२७९२ रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ केला. काही दिवसांपूर्वी शास्त्री वार्डातील एका गृहस्थाच्या घरासमोर उभी असलेली सायकल भरदिवसा चोरांनी चोरून नेली. सायकलवर दुचाकीप्रमाणे क्रमांक राहात नाही तेव्हा तक्रार करूनही ती मिळणार नाही या विचाराने त्यांनी पोलीस तक्रार केली नाही. त्याचप्रमाणे गेल्या तिन दिवसांपुर्वी शहरातील एका हार्डवेअर दुकान चालकाने दुकानासमोरुन दुचाकी पळवुन नेल्याची तक्रार केली. गेल्या पंधरवाड्यापूर्वी नेरला – चाचेर परीसरात पाच ते सहा जनांचा समुह स्कोर्पीओ वाहनाने येऊन रस्त्यावर उभे राहात लुटमारीचा प्रयत्न करीत असल्याची माहीती मौदा मार्गावरील एन.टी.पी.सी. मध्ये काम करणाऱ्या व नेहमी या मार्गावरून रहदारी करणाऱ्या काही कामगारांनी दिली. त्यावेळी रहदारी करणाऱ्या त्या कामगारांमध्ये भितीचे तथा असुरक्षीततेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. ४ महिन्यांपुर्वी स्थानिक बसस्थानकावर आलेल्या बैतुल येथील एका महिलेच्या जवळील दागिन्यांसह रोख रकमेवर भरदिवसाच चोरट्यांनी हात साफ करीत पसार झाले होते. आरोपींना पकडण्यात नंतर पोलिसांना यश आले असले तरी मात्र या रामटेक परीसरात चोरी करण्यास चोरट्यांना स्थानिक पोलीस प्रशाषणाचा कोणताही धाक राहीला नसल्याचे दिसुन येत आहे. गेल्या काही महिन्यांपुर्वी मनसर मार्गावरील खैरी बिजेवाडा येथील जिल्हा परीषद शाळेत ठेवलेल्या वॉटर कॅन्ससह जिम च्या साहित्यावर हात करून १ लक्ष ४ हजार काही रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दिवस असो की रात्र, चोरटे याचा तिळमात्रही विचार करीत नसुन त्यांना जे करायचे राहाते ते करतातच. एकंदरीत गेल्या एक – दोन वर्षात चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. चोरट्यांनी रामटेक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या परीसरात जणु उच्छाद मांडला असुन त्यांना ‘ खाकीचा ‘ तिळमात्रही धाक नसल्याचे नागरीकांमध्ये बोलल्या जात आहे. परीणामस्वरूप नागरीकांमध्ये स्वतःजवळील मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न भेडसावत असल्याचे दिसुन येत आहे.
पेट्रोलींग सुरु, तरीही घटना थांबता थांबेना
स्थानिक पोलीस प्रशाषणातर्फे नियमीत रात्रकालीन पेट्रोलींग करण्यात येते यात दुमत नाही. पोलीस प्रशाषणाचे वाहन सायरन वाजवत गावासह परिसरात वळसा घालते. असे असले तरी मात्र यामुळे चोरट्यांच्या उच्छादावर कोणत्याही प्रकारचा अंकुश लागत असल्याचे दिसुन येत नाही. अधुन मधुन चोरीच्या घटना होतच आहेत. जणु चोरटे या भागात निडर होवुन बिनधास्तपणे चोरी करीत असल्याचे व चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यास स्थानीक पोलिस प्रशाषण सपशेल फेल ठरत असल्याचे नागरीकांमध्ये बोलल्या जात आहे.