नागपूर :- जे आमदार पाच वर्ष निवडून येतात त्यांना पेंशन मिळते पण तीस वर्ष काम करूनही शिक्षक कर्मचाऱ्यांना पेंशन मिळत नाही हा विरोधाभास योग्य नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेत केली.
महाराष्ट्रातील हजारो शिक्षक कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती पेंशन म्हणजेच जुन्या पेंशन संदर्भात लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार विक्रम काळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
‘एकच मिशन जुनी पेंशन’ या घोषवाक्याने आपल्या विषयाची सुरुवात आमदार विक्रम काळे यांनी करून विषयाचे गांभीर्य सभागृहाला पटवून दिले.
राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पासून पुढे सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेंशन योजना लागून करण्यात आली. मात्र यापूर्वी जे कर्मचारी सेवेत आले त्यांच्या शाळेला अनुदान नसल्याने त्यांना जुनी पेंशन योजनेपासून वंचित रहावे लागले या शिक्षकांचा विषय आमदार विक्रम काळे यांनी सभागृहात मांडला. या प्रश्नाकरीता लाखो शिक्षक कर्मचाऱ्यांचा मोर्चा विधानभवनाकडे आला असल्याची माहीती त्यांनी दिली. या कर्मचाऱ्यांचे पीएफ कपात बंद असल्याने त्यांची कपात आजच सुरू करण्याची मागणी आमदार विक्रम काळे यांनी केली.
यापूर्वीदेखील या प्रकरणात प्रकाश टाकण्यात आला होता. यासाठी सम्यक समिती स्थापन करण्यात आली असून त्या समितीने सविस्तर अहवाल सादर असला तरीही तो अजूनही त्याचे उत्तर आलेले नाही अशी खंतही आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केली.