माहिती अधिकार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर :-  देशात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू करण्यात आला आहे. शासनाने वेळोवेळी जाणीवपूर्वक उचललेल्या पावलांमुळे अल्पावधीतच् राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरुपात लोकाभिमुख झाला आहे. त्यामुळे हा दिवस राज्य पातळीवर दरवर्षी ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये माहितीचा अधिकार या विषयावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्रात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी, यासाठी उद्या, बुधवारी 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठामध्ये सकाळी 11 वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने प्रश्नमंजूषा, चित्रकला, निबंध व वक्तृत्व इ. सारख्या स्पर्धा तसेच चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहेत. विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते व इच्छुक गटांसाठी भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चर्चासत्र, तसेच व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहेत.

या उपक्रमांसाठीच्या पारितोषिकांची व्यवस्था स्थानिक पातळीवर लायन्स क्लब, रोटरी क्लब अशा विविध समाजसेवी संस्थांच्या सहयोगाने करण्यात यावी. अशा प्रकारे हा दिवस राज्य पातळीवर दरवर्षी ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करून माहितीच्या अधिकाराबाबत समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. जिल्ह्यात हे उपक्रम व्यापक पातळीवर राबविण्याची जबाबदारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात येत आहे. या कायद्यातील तरतुदी आणि कार्यपध्दती, विविध उपक्रम राबवून, त्या जास्तीत-जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा शासनाचा मानस असल्याचे पांडे यांनी सांगितले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com