नागपूर :- नागपूर शहरातील प्रमुख नद्या आणि नाले सफाईच्या कामाला सुरूवात झालेली आहे. शहरातून वाहणा-या नद्या आणि नाल्यांची सुरळीतरित्या पुरेपूर सफाई व्हावी यासाठी पथक गठीत करा, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अधिका-यांना दिले.
शुक्रवारी (ता.१९) मनपा आयुक्तांनी नदी व नाले सफाई अभियानाच्या कार्याचा आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता (सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग) डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे, सहायक आयुक्त सर्वश्री मिलींद मेश्राम, प्रकाश वराडे, गणेश राठोड, हरीश राउत, विजय हुमने, घनश्याम पंधरे, कार्यकारी अभियंता सर्वश्री विजय गुरूबक्षाणी, अनिल गेडाम, उज्ज्वल धनविजय, सिंघमझोडे, रक्षमवार, अजय पझारे यांच्यासह सर्व झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नदी स्वच्छता अभियानामध्ये येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांनी शहरातील नाग नदी, पिवळी नदी, पोहरा नदी या तिनही नद्यांची माहिती दिली. या तिनही नद्यांची १२ टप्प्यांमध्ये पॅचेसनुसार स्वच्छता केली जाते. स्वच्छतेसाठी मनुष्यबळ आणि मशीनचा उपयोग केला जात आहे. उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी शहरातील नाल्यांची माहिती सादर केली. शहरात 227 नाले असून यापैकी ७४ नाल्यांची मशीनद्वारे तर 153 नाल्यांची मनुष्यबळाद्वारे स्वच्छता केली जाते. डिसेंबर अखेरपासूनच नाले सफाईच्या कामाला सुरूवात झालेली असून आतापर्यंत २४ नाल्यांची सफाई पूर्ण झालेली आहे. तर इतर नाल्यांची सफाई सुरू असल्याचे डॉ. महल्ले यांनी सांगितले.
नागपूर शहरातील प्रत्येक नदी आणि नाल्याची योग्यरित्या सफाई व्हावी यासाठी मनुष्यबळ तसेच आवश्यक मशीनचा समावेश असलेले पाच पथक तयार करण्यात यावे. हा पथकांद्वारे सफाई करावयाच्या नदी, नाल्यांचे दिवसानुसार सविस्तर वेळापत्रक तयार करून त्यानुसार सुरळीत काम करावे. नदी, नाले सफाईमध्ये अडचण येत असलेल्या ठिकाणांची माहिती अतिरिक्त आयुक्तांना देउन त्या बाबत कार्यवाही करावी. नदी अथवा नाल्यांमधून काढण्यात येणारा गाळ नदी काठावर न ठेवता तो मनपाच्या मालकीच्या जागा निश्चित करून त्यात टाकावा. मनपा मालकीची जागा उपलब्ध नसल्यास उपलब्ध शासकीय जागेच्या वापरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी घेउन त्यात तो जमा करावा, असे देखील मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले.
नदी, नाल्यांवरचे अतिक्रमण काढा
नदी किंवा नाल्याच्या काठावरील निश्चित केलेले (आयडेन्टिफाईड) अतिक्रमण काढण्याबाबत देखील आयुक्तांनी निर्देश दिले. नाल्यालगत किंवा नदीलगत अतिक्रमण असल्यास त्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करणे बाबत आयुक्तांनी सूचित केले. नदी स्वच्छता अभियानात झोन स्तरावर संपूर्ण व्यवस्थापन करण्याचे देखील आयुक्तांनी सांगितले.