Ø अन्नदान वाटपासाठी अन्न प्रशासन विभागाची परवानगी अनिवार्य
Ø शहर व एसटी बसेसची मुबलक उपलब्धता ठेवण्याचे निर्देश
Ø पिण्याचे पाणी व स्नानगृह उपलब्धतेच्या सूचना जागोजागी लावणार
Ø मुख्य समारोह परिसर नो प्लास्टिक झोन कटाक्षाने पाळणार
नागपूर :- प्रशासनासाठी नागपूर दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तनदिनाचे आयोजन महत्वपूर्ण उत्सवपर्व असून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक अनुयायांना आरोग्य, सुरक्षा, स्वच्छता, खानपान सुविधांचा योग्य वापर करता यावा, याची खातरजमा प्रत्येक विभागाने करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आढावा बैठकीत आज दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी गेल्या दोन दिवसात घेतलेल्या आढावा बैठकी व प्रत्यक्ष पाहणीनंतर आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी महाराष्ट्रातील या भव्य आयोजनाच्या तयारीचा विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला.
येत्या २४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी येथे 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन होत आहे. त्यासाठीच्या व्यवस्थेसंदर्भात बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस उपायुक्त अनुराग जैन, अतिरिक्त जिल्हाधिकारी आाशा पठाण, उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य डॉ.सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, प्रा.प्रदीप आगलावे यांच्यासह प्रशासनाच्या विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने केलेल्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना बिदरी यांनी यावेळी दिल्या.
स्वच्छता, आरोग्य, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्नानगृहे, शौचालये, सुरक्षा आदी व्यवस्थेसह अनुयायांच्या आरोग्याची काळजी घेताना या वर्षी अन्नदान वाटपासाठी संबंधित संघटनांना अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणे आवश्यक राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात अन्नछत्र उघडल्या जाते. या मागची भावना कौतुकास्पद असली तरी बाहेरून येणाऱ्या नागरिकांना मिळणारे अन्न तपासून जायला हवे. त्यासाठी सोप्या, सुलभ पद्धतीचा अवलंब करावा. अन्न व औषधी विभागाने या काळात अधिक तत्परतेने सेवा द्यावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने अभिवादनासाठी येणाऱ्या राज्याच्या विविध भागांसह देश-विदेशातील अनुयायांना सर्व प्रकारच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या नियोजनाबाबत यावेळी विभागनिहाय माहिती देण्यात आली. दीक्षाभूमी व परिसरात एकूण 70 ठिकाणी पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याच्या अतिरिक्त टँकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्वच्छतेची विशेष काळजी घेत दीक्षाभूमी परिसरातील चिन्हीत 10 रस्त्यांवर 150 स्वच्छता कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, रेल्वे स्थानक व बसस्थानकांवरही स्वच्छतेची काळजी घेण्यात येणार आहे. याठिकाणी मोबाईल टॉयलेट आणि 900 अस्थायी स्वच्छतागृहांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. दीक्षाभूमी परिसरातील रस्त्यांवरील कचरा व्यवस्थापनासाठी 200 ट्रकची व्यवस्था करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. बिदरी यांनी प्रशासनाला याव्यवस्थेसंदर्भात घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शन व आवश्यक सूचना केल्या.
अन्नदान वाटपासाठी लागणार परवानगी
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी राज्य, देश-विदेशातून येणाऱ्या अनुयायांना विविध संघटना व व्यक्तींद्वारे प्रसाद स्वरुपात अन्न वाटप करण्यात येते. यासंदर्भात अनुयायांना अन्नातून विषबाधा होऊ नये याची काळजी घेण्यासाठी संबंधित व्यक्ती व संघटनांनी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी अशा सूचना बिदरी यांनी दिल्या. त्यानुसार आता अन्नदान वाटपासाठी व्यक्ती व संस्थांना www.foscos.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणीसाठी अर्ज करावा लागणार आहे.
रेल्वे व बसस्थानकांपासून दीक्षाभूमी येथे अनुयायांना घेऊन जाण्यासाठी मनपाने 150 बसेसची व्यवस्था केली आहे. तर कामठी येथील ड्रॅगन पॅलेस ते दीक्षाभूमी पर्यंत अनुयायांना ये-जा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 110 बसेसची व्यवस्था केली आहे. जिल्हा प्रशासनाने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमी परिसरात प्लास्टिक फ्री झोन राबविण्याची घोषणा केली आहे. यानुसार आयोजनामध्ये कुठल्याही प्रकारे सिंगल युज प्लास्टिक वापरास बंदी घालण्यात आली आहे.याशिवाय आरोग्य विभागाने विविध वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी व्यवस्था केली आहे. सुरक्षेसाठी पोलीस विभागाने पूर्ण व्यवस्था केली असून दीक्षाभूमी परिसरात जागोजागी सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.