भंडारा :- मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी यासह मुलींचा मुत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे व शाळाबाहय मुलींचे प्रमाण शुन्यावर आणणे यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” योजना सुरु केली आहे. पात्र लाभार्थ्यांनी अटी व शर्तीच्या अधीन राहुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात येत आहे.
पुर्वीची माझी कन्या भाग्यश्री योजना (सुधारीत) ही योजना आता “लेक लाडकी योजना” म्हणून नव्या स्वरुपात 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींसाठी लागू करण्यात येत आहे. ही योजना पिवळया व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींसाठी लागू करण्यात आली आहे. हि योजना पिवळया व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणा-या एक किंवा दोन मुलींना लागू राहील. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहिल.
पहिल्या अपत्याच्या तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्याच्या दुस-या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता/पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे. तसेच दुस-या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल. मात्र त्यानंर माता/पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहिल. 1 एप्रिल 2023 पुर्वी एक मुलगी, मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुस-या मुलीस किंवा जुळया मुलींना स्वतंत्रपणे हि योजना अनुज्ञेय राहिल. मात्र माता, पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहिल. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे. लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. 1 लक्ष पेक्षा जास्त नसावे. अशा अटी व शर्ती या योजनेकरीता लागू राहिल.
योजनेंतर्गत देय लाभ- पिवळया व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पुर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येईल.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे- लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखांचा उत्पन्न दाखला, याबाबत तहसीलदार, सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहिल. लाभार्थींचे आधार कॉर्ड, पालकाचे आधार कॉर्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशनकॉर्ड मतदान ओळखपत्र, संबंधीत टप्पयावरील लाभाकरीता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधीत शाळेचा दाखला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र अंतिम लाभाकरीता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहिल.
अर्ज मिळण्याचे ठिकाण – नागरी व ग्रामीण बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) जिल्हा परिषद, विभागीय उपायुकत (महिला व बालविकास) या कार्यालयात अर्ज उपलब्ध होतील. तसेच त्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरुन घेऊन तो अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचेकडे सादर करु शकतील. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी नजीकच्या अंगणवाडी केंद्रातून सदर योजनेचा लाभ घ्यावा याबाबत महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद भंडारा मार्फत आवाहन करण्यात येत आहे.