पुणे :- जिल्ह्यात ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत ० ते ५ वयोगटातील बालकांना पूर्वीचे डोस देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले असून नागरिकांनी आपल्या बालकांना पूर्वीचा डोस अवश्य द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी केले.
जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या सभेत चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ३ मार्च रोजी राबविण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. भारत हा पोलिओ मुक्त देश आहे. मात्र काही देशांमध्ये पोलीओ अजूनही आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिओ लसीकरण मोहीम २०२४ राबविण्यात येत आहे.
कोणताही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून ही मोहिम १०० टक्के यशस्वी करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
देसाई म्हणाले, मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गाव व पाड्यावर आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यासह ४०५ आरोग्य पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पाच लाखापेक्षा अधिक बालकांना पोलिओचा डोस देणार
या मोहिमेमध्ये ० ते ५ वर्ष वयोगटातील ग्रामीण भागातील ४ लाख ९८ हजार ७९८ व शहरी भागातील ७७ हजार ६४९ अशा एकूण ५ लाख ७६ हजार ४४७ बालकांना रविवार तीन मार्च रोजी पल्स पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. स्थलांतरित कुटुंबे, ऊसतोड व बांधकाम कामगार यांचा शोध घेऊन सर्व ० ते ५ वर्ष बालकांना प्रत्यक्ष भेट देऊन पोलिओ डोस देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले आहे.
पल्स पोलिओ लसीकरण दिनाच्या दिवशी डोस घेण्यात आलेला नसेल, अशा वंचित राहिलेल्या बालकांना ग्रहभेटी दरम्यानच्या कालावधीमध्ये पोलिओ डोस देण्याचा ग्रामीण भागात ५ ते ७ मार्च (३ दिवस) व शहरी भागात ५ ते ९ मार्च (५ दिवस) पर्यंत आयपीपीआयच्या कालावधीत पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.