आर्किटेक्चरसह ९२ विद्यार्थिनींनी पूर्ण केला कौशल्य अभ्यासक्रम

– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे रोजगार व प्रशिक्षण सेल तसेच श्रीमती मनोरमाबाई मुंडले आर्किटेक्चर महाविद्यालयाचा उपक्रम

नागपूर :- आर्किटेक्चर मधून शिक्षण पूर्ण करीत असताना नागपूर येथील ९२ विद्यार्थिनींनी २४५ तासांचा कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे रोजगार व प्रशिक्षण सेल, श्रीमती मनोरमाबाई मुंडले आर्किटेक्चर महाविद्यालय तसेच टाटा स्ट्राईव यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबविण्यात आला. एकाच वेळी ९२ विद्यार्थिनींनी ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करीत कौशल्य प्रमाणपत्र प्राप्त करणारे श्रीमती मनोरमाबाई मुंडले आर्किटेक्चर महाविद्यालय हे पहिले महाविद्यालय ठरले आहे. टाटा स्ट्राईव कंपनी प्रतिनिधींच्या उपस्थितीत महाविद्यालय तसेच विद्यार्थिनींना शुक्रवार, दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

श्रीमती मनोरमाबाई मुंडले आर्किटेक्चर महाविद्यालय येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमाला वुमेन्स एज्युकेशन सोसायटी नागपूरचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश देशमुख, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रुपल देशमुख, विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन, टाटा स्ट्राईव कंपनीचे देवदत्त पत्रे, आकांक्षा गुप्ता, राजीव सोनेकर, डॉ. रश्मी तिजारे आदी उपस्थित होते. पारंपरिक अभ्यासक्रमासोबत कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे द्वार विद्यार्थ्यांकरिता उघडे झाले आहे. अनेक नामवंत शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थ्यांना ऑनलाइन कौशल्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना एका अभ्यासक्रमासोबत अन्य विषयाचे शिक्षण देखील घेण्याची मुभा देण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेता  कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण सेल, टाटा स्ट्राईव कंपनीच्या वतीने श्रीमती मनोरमाबाई मुंडले आर्किटेक्चर महाविद्यालयातील विद्यार्थिनींकरिता हा ऑनलाइन कौशल्य अभ्यासक्रमाचा उपक्रम राबविण्यात आला.

देशात प्रथमच एकाच महाविद्यालयातील तब्बल ९२ विद्यार्थिनींनी कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यामुळे टाटा स्ट्राईव कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रमाणपत्र देत महाविद्यालयाचा देखील सन्मान केला. टाटा स्ट्राईवचे देवदत्त पत्रे यांनी प्रमाणपत्र संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश देशमुख, प्राचार्य डॉ. रुपल देशमुख, डॉ. रश्मी तिजारे यांच्या स्वाधीन केले. यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते कौशल्य अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

६ महिन्यांचा अभ्यासक्रम २ महिन्यात पूर्ण

टाटा स्ट्राईव कंपनीच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘गुगल स्कॉलरशिप सर्टिफिकेशन प्रोग्राम’ अंतर्गत वेब डिझाईनिंग सोबतच संबंधित हा अभ्यासक्रम सहा महिने इतका कालावधीचा आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये वेब पेज डिझाईनिंग, ॲप डिझाईनिंग सोबत विविध आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबत कौशल्य शिकविण्यात आले. या अभ्यासक्रमाकरिता श्रीमती मनोरमाबाई मुंडले आर्किटेक्चर महाविद्यालयातील ११० विद्यार्थिनींनी नोंदणी केली होती. सहा महिन्यांचा म्हणजेच २४५ तासांचा अभ्यासक्रम विद्यार्थिनींनी दोन महिन्यातच पूर्ण केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ईद-उल-फित्र निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

Sat Apr 22 , 2023
मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात प्रार्थना, उपवास आणि दानपुण्याच्या माध्यमातून अंतर्मन शुद्धीला महत्व दिले गेले आहे. आत्मकल्याणातून विश्वकल्याणाचा प्रशस्त मार्ग दाखवणारा हा महिना आहे. ही ईद सर्वांच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो व परस्पर बंधुभाव वृद्धिंगत करो अशी प्रार्थना करतो व सर्वांना, विशेषतः मुस्लिम बांधवांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!