तणावमुक्त जीवनासाठी विश्वशांती आवश्यक – राज्यपाल

पुणे :- जगात आज युद्ध, विविध समूहांत तणावाची स्थिती आढळत असून अशा परिस्थितीत माणसाला तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगता यावे, यासाठी जागतिक शांतता गरजेची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

साधु वासवानी मिशन, पुणे द्वारा दादा जे. पी. वासवानी यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन राज्यपाल बैस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय दळण-वळण राज्य मंत्री देवूसिंह चौहान, आमदार सुनील कांबळे, इंदूरचे आमदार शंकर लालवाणी, महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्राचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल किसनकुमार शर्मा, साधू वासवानी मिशनच्या अध्यक्षा श्रीमती आर. ए. वासवानी, कार्यकारी प्रमुख कृष्णाकुमारी, डॉ. वसंत आहुजा, पुणे क्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाय, डाक सेवा संचालक सिमरन कौर आदी उपस्थित होते.

राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, व्यक्तीची आंतरिक शांती, राष्ट्रांमधील शांततापूर्ण संबंध आणि निसर्गासोबत शांततापूर्ण सहअस्तित्व या तीन पैलूंवर जागतिक शांतता आधारित आहे. आज वैयक्तिक, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर तणावाची स्थिती असताना आपल्याला अंतर्गत, बाह्य तसेच निसर्गासोबत शांतता गरजेची आहे. गौरवशाली इतिहास असणारा आपला भारत देश शांततापूर्ण सहअस्तित्वाचे मार्गदर्शन करू शकतो.

महाराष्ट्र ही संत आणि महापुरुषांची भूमी आहे. दादा जशन वासवानी यांच्यातही संत आणि समाज सुधारकांचा समन्वय पहायला मिळतो. ते विचारवंत, लेखक आणि तत्वचिंतक होते. त्यांचे जीवन बंधूभाव, शांती, सद्भावना, करुणा आणि शांतीपूर्ण सहअस्तित्व या मूल्यांवर आधारित होते. नैतिक मूल्य निकोप समाजासाठी आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या पैलूंवर भर देण्यात आला आहे, असे राज्यपाल म्हणाले.

साधू वासवानी यांच्या प्रमाणेच त्यांचे विद्वान शिष्य आणि उत्कृष्ट वक्ता असलेल्या दादा वासवानी यांनी आपल्या प्रवचन आणि लेखांद्वारे देश – विदेशातील लाखो लोकांना आदर्श जीवन जगण्यासाठी प्रेरित केले. ते महाराष्ट्रातील शांती आणि सद्भावनेचे दूत होते. साधू वासवानी मिशनच्या माध्यमातून दादा जे. पी. वासवानी यांनी शैक्षणिक संस्था, रुग्णालय आणि अन्य सेवाकार्य उभे केले. जात, धर्म, पंथाचा विचार न करता समाजातील सर्व घटकांची सेवा मिशनच्या माध्यमातून होत आहे, अशा शब्दात त्यांनी मिशन आणि दादा वासवानी यांच्या कार्याचा गौरव केला.

केंद्रीय राज्यमंत्री चौहान म्हणाले की, भारताला संताची परंपरा असल्याचा आपल्याला अभिमान आहे. संत दादा वासवानी सहज आणि सरळ व्यक्त‍िमत्व होते. त्यांचे कार्य नेहमीच समाजाला प्रेरणादायी ठरेल, असे होते. त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानाचे पालन करणे आणि ते आचरणात आणणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

यावेळ वासवानी यांनी साधू वासवानी मिशनच्या कार्याची माहिती दिली. दादा वासवानी यांचा एकात्मता, बंधूभाव, शांतता आणि अध्यात्माचा संदेश आचरणात आणणे हेच त्यांचे खऱ्या अर्थाने स्मरण आहे, असे त्या म्हणाल्या.

यावेळी ‘नर्क से स्वर्ग तक’ या हिंदी आणि ‘स्वतः सक्षम बना’ या मराठीतील पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इन्फोसिस यांच्यात सामंजस्य करार

Wed Sep 13 , 2023
– विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आणि संवाद कौशल्याच्या दृष्टीने ठरेल उपयुक्त – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मुंबई :- विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आणि संवाद कौशल्याच्या दृष्टीने उपयुक्त इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवन शैली अभ्यासक्रम महाविद्यालयात शिकविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!