– तरुणांनी रोजगाराबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर: पश्चिम नागपुरातही जन आशीर्वाद यात्रेला उदंड प्रतिसाद
नागपूर :- नागपूर शहरातील महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास आणि मेट्रो सारख्या अनेक सरकारी संस्थांमध्ये कंत्राटीपद्धतीने काम सुरु आहे. याचा लाभ काही विशिष्ट कंत्राटदारांना होत आहे. या उलट येथे काम करणाऱ्या तरुणांना शैक्षणिक योग्यतेनुसार सन्मानजक वेतन दिल्या जात नाही. यावर उपाय म्हणून काँग्रेसच्या पाच न्यायापैकी युवा न्याय अंतर्गत शासकीय कार्यालयातील रिकामी असलेली पदे भरणार आणि कंत्राटी पद्धत बंद करुन तरुणांना सरकारी नोकरी मिळेल, असे आश्वासन इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी दिले. सोमवारी सकाळी पूर्व नागपुरात आयोजित जन आशीर्वाद यात्रेत तरुणांनी रोजगाराबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
पुढे ठाकरे म्हणाले की, “शहरात मिहानसह अनेक मोठे प्रकल्प, केंद्र आणि राज्य सरकारचे कार्यालय असताना नागपुरातील तरुणांना रोजगारासाठी मुंबई, पुणे, बंगळुरु, हैद्राबाद गाठावे लागत आहे. त्यामुळे नागपुरातील नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल. म्हणून आता परिवर्तनाची गरज आहे.”
पारडी येथून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली. नंतर भांडेवाडी-टीएल चर्च-भोलेनगर-टॉवर लाईन रोड-चांदनी चौक-रामभूमी-पारडी चौक-दुर्गा नगर-शितला माता मंदिर- राजा भोज कॉलनी- भोलेश्वर वाट-भरतवाडा चौक-झेंडा चौक-लक्ष्मीनगर चौक-गवली नगर- म्हाडा कॉलनी-सोनबा नगर – एचबीटाऊन चौक-मिनिमाता नगर-कलमना मार्केट परिसर-चिखली वस्ती-डिप्टी सिग्नल-शिवाजी चौक-छत्तीसगढ बँक चौक मार्गे सकाळच्या यात्रेचे समारोप झाले. त्यानंतर दुपारी तीन वाजता जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याची सुरुवात मानस चौक येथे झाली. त्यानंतर टेंपल बाजार रोड-आनंद टॉकीज चौक-कुंभार टोली-यशवंत स्टेडियम-पंचशील चौक-लोकमत चौक-रामप्रसाद चौधरी चौक-लिगो मैदान-वानखेडे हॉल-धरमपेठ टांगा स्टॅन्ड मार्गे छोटी गवलीपुरा येथे यात्रेचे समारोप झाले. प्रामुख्याने आमदार अभिजीत वंजारी, पुरुषोत्तम हजारे, उमाकांत अग्निहोत्री, तानाजी वणवे, संगीता तलमले, ऋतिका डाफ मसमारे, ज्ञानेश्वर ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
परिवर्तनासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनीही कसली कंबर
इंडिया आघाडीतील घटक असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी विकास ठाकरेंच्या प्रचारासाठी भिडले आहे. शहराच्या खऱ्या विकासासाठी ठाकरेंनाच मत द्या आणि परिवर्तन घडवा असे आवाहन करत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना आश्वासन दिले. सर्वांचा हा विश्वास बघून यंदा परिवर्तन घडणारच असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला.
कामगार संघटना संयुक्त कृती समिती पाठीशी
सोमवारी महाराष्ट्र कामगार संघटना संयुक्त कृती समितीची परवाना भवन येथे कामगार-कर्मचाऱ्यांचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. समाजातील कामगार, शेतकरी, विद्यार्थी, दलित, आदिवासी, महिला, अल्पसंख्यांक वर्गाच्या हितांच्या रक्षणासाठी ही इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदार विकास ठाकरे यांना पाठींबा जाहीर केला आहे. तसेच यंदा देशासह नागपूरातही परिवर्तन घडणार असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
विदर्भवीर जाम्बुतराव धोटे यांच्या परिवाराने केले ठाकरेंना मतदानाचे आवाहन
देशात आणि राज्यात विदर्भाला वेगळी ओळख मिळवून देणारे, अकरा वर्ष नागपूरचे खासदार राहीलेले विदर्भवीर जाम्बुतराव धोटे हे नेहमीच गरीब वंचितांसाठी लढले. विनकरांचा (हलबा) आंदोलन असो किंवा अकोल्याचा कृषी विद्यापीठ (PDKV) खेचून आणण्याचा लढा असो, जाम्बुतराव धोटे यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही. स्वतंत्र विदर्भाचा लढा दिल्लीपर्यंत घेऊन जाण्याचे धाडस फक्त जाम्बुतराव धोटे यांच्यातच होते. विदर्भाच्या जनतेने जाम्बुतराव धोटे यांना विदर्भवीर अशी पदवी दिली आणि त्यांचा उल्लेख देशभरात विदर्भाचा सिंह म्हणून व्हायचा. रामटेक लोकसभेतून पहिले हलबा नेतृत्व त्यांनी राम हेडाऊ यांच्या रुपात संसदेत पाठविले होते. विदर्भातल्या सर्व वारांगणा माता-बहिणी या ऐतिहासीक कस्तूरचंद पार्क मध्ये रक्षाबंधनला भाऊ म्हणून जाम्बुतराव धोटे यांना राखी बांधायच्या. भाऊ म्हणून जाम्बुतराव धोटे यांनी त्यांच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारली असल्याची माहिती ज्वाला जाम्बुतराव धोटे यांनी दिली. जाम्बुतराव धोटे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कन्या ज्वाला धोटे ह्या वारांगना संघटनेचा नेतृत्व करतात. वारांगणा संघटनेनी ज्वाला धोटेंना काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांना समर्थनाचे पत्र आणून दिले आहे. त्यानुसार ज्वाला धोटे यांनी सर्वांच्यावतीने आणि परिवाराच्यावतीने विकास ठाकरेंना पाठींबा जाहीर केला आहे.