– उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मनपाच्या स्मार्ट पब्लिक टॉयलेटचे कौतुक
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध भागांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या ‘स्मार्ट पब्लिक टॉयलेट’च्या कार्याचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता.२१) आढावा घेतला. नागपूर मनपाच्या या संकल्पनेचे कौतुक करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही संकल्पना बारामतीमध्ये देखील राबवून अशाच प्रकारचे स्मार्ट टॉयलेट उभारण्याची इच्छा व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीमध्ये मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, कार्यकारी अभियंता कमलेश चव्हाण, आर्किटेक राहुल भैय्या आणि श्रीमो कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर शहरामध्ये विविध महत्वाच्या ठिकाणी ‘स्मार्ट पब्लिक टॉयलेट’ निर्माण करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी ते पूर्णत्वास देखील आलेले आहेत. शहरात मनपाद्वारे ४२ नवीन स्मार्ट पब्लिक टॉयलेट निर्माण केले जात आहेत. यासाठी एकूण २२.९० कोटी रुपये निधी प्रस्तावित असून याचे कार्यादेश देखील झालेले आहेत. नागपूर शहरात विधानसभानिहाय गरज असलेल्या, गर्दीच्या, बाजार परिसराच्या ठिकाणी हे स्मार्ट पब्लिक टॉयलेट बनविण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या कार्यात कुठलेही अडथळे येऊ नयेत या उद्देशाने महाराष्ट्र राज्य महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपूर सुधार प्रन्यास, सार्वजनिक बांधकाम विभाग, महा मेट्रो अशा सर्व प्राधिकारणांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आलेले आहेत.
मनपाच्या स्लम विभागाद्वारे तयार करण्यात आलेल्या या स्मार्ट पब्लिक टॉयलेटमध्ये महिला आणि पुरूषांसाठी स्वतंत्र शौचालय, लघुशंकेची व्यवस्था असणार आहे. याशिवाय महिलांसाठी चेंजिंग रूम, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन तसेच डिस्ट्रॉय मशीन, हँड ड्रायर, सेन्सर प्रणालीयुक्त दरवाजे आदी सुविधा असणार आहेत. स्मार्ट पब्लिक टॉयलेटमध्ये लघुशंका करीता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. दिव्यांगांकरिता स्वच्छतागृहांमध्ये व्हिल चेअर ची व्यवस्था आहे. स्वच्छतेसोबतच संपूर्ण परिसर सुंदर असावे यासाठी प्रवेशद्वारावर हिरवळ आहे. स्मार्ट पब्लिक टॉयलेटची योग्य देखरेख व्हावी याकरिता मनपाद्वारे स्वच्छतागृहाच्या वरच्या भागात देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी खोली तयार करण्यातआलेली आहे.