यवतमाळ :- जनसेवक म्हणून मी करत असलेली कामे आणि माझी भूमिका जनतेला पटली त्यामुळेच गेल्या पाच टर्ममध्ये आमदार म्हणून माझ्या मतांची टक्केवारी सातत्याने वाढती आहे. यापुढेही जनसेवक म्हणून अधिक चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. जनता हाच माझा परिवार आहे. आपण एकाच कुटुंबातील सदस्य आहोत, असे भावोद्गार राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी काढले.
मंत्री झाल्यानंतर यवतमाळात प्रथम आगमनानिमित्त शिवसेनेच्या वतीने बुधवारी येथील बचत भवनमध्ये आयोजित सत्कार व स्वागत सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड,पराग पिंगळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कालिंदा पवार, माजी आमदार विश्वास नांदेकर, जीवन पाटील, युवासेनेचे विशाल गणात्रा व जिल्ह्यातील सर्व शिवसेना प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळी १० वाजता यवतमाळात पोहोचताच ना. संजय राठोड यांनी निळोणा येथील दीनदयाल प्रबोधिनीत जावून पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर स्थानिक वनवासी मारोती चौकात जिल्हाभरातून आलेल्या शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांनी फटाके फोडून व ढोल ताशाच्या गजरात ना. संजय राठोड यांचे स्वागत केले. येथे संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी अरदास केली. तेथून वनवासी मारोती मंदिरात अभिषेक व आरती केली. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने संजय राठोड यांचा सत्कार करण्यात आला. ना. संजय राठोड यांनी रोड शोसाठी नकार दिल्यानंतरही जिल्हाभरातून आलेले शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, चाहते व बंजारा बांधवांनी वाजत गाजत उत्स्फूर्तपणे दुचाकी व चारचाकी रॅली काढली. त्यामुळे शहर भगवेमय झाले होते. यावेळी विविध ठिकाणाहून आलेल्या कलाकारांनी आदिवासी नृत्य, बंजारा नृत्य सादर केले.
या दरम्यान ना. संजय राठोड यांनी आर्णी नाका परिसरात भगवान बिरसा मुंडा, जिल्हा परिषदेत कै. वसंतराव नाईक, संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज, येरावार चौकात महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले. जिल्हा परिषदेच्या प्रवेशदारावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा यशवंत पवार यांच्या वतीने जेसीबीद्वारा भलामोठा पुष्पहार घालून ना. संजय राठोड यांचे स्वागत करण्यात आले.
संविधान चौकात व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशदारावर फुलांच्या पाकळ्या उडवून त्यांचे स्वागत करण्यात आले. मार्गात ठिकठिकाणी नागरिकांनी ना. संजय राठोड यांचे स्वागत केले. त्यानंतर बचत भवन येथे शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या वतीने आयोजित सत्कार व स्वागत समारंभ झाला. तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी सुद्धा यावेळी ना.संजय राठोड यांचा सत्कार केला. यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रवीण निमोदिया मित्र परिवारातर्फे ना. संजय राठोड यांची लाडूतुला करण्यात आली.
सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करताना येथील जनतेने मला भारभरून प्रेम व आशीर्वाद दिले. त्याचीच प्रचिती आजच्या स्वागत सोहळ्यात आली. भविष्यात अधिक चांगले काम करून व मतदारसंघ आणि जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न राहील, असे यावेळी बोलताना संजय राठोड म्हणाले. त्यानंतर ना. संजय राठोड यांचा यवतमाळ जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नंदू बुटे, उपाध्यक्ष संजय हातगावकर व पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत सोहळ्याला शिवेसनेचे सर्व तालुका प्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ना. संजय राठोड यांचे चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.