यवतमाळ :- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीजमार्फत महाबीज उत्कृष्ठता केंद्र, पैलपाडा येथे दिन. 4 फेब्रुवारी पर्यंत शिवार फेरी रब्बीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवार फेरीचे उद्घाटन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेज कुंभेजकर यांचे शुभहस्ते तसेच महाबीजचे संचालक वल्लभरावजी देशमुख व संचालक डॉ. रणजित सपकाळ यांच्या उपस्थितीत झाले.
उद्घाटन प्रसंगी महाबीज बियाणे संशोधनाची पुढील दिशा शेतकरीभिमूख राहील याची ग्वाही देऊन महाबीजच्या नवीन उपक्रमाबद्दलची माहिती व्यवस्थापकीय संचालक योगेज कुंभेजकर यांनी अध्यक्षीय भाषणात दिली. महाबीज बिजोत्पादन कार्यक्रम कसा फायदेशीर आहे याचे महत्त्व विषद करुन राज्यातील शेतकरी बांधवांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख यांनी याप्रसंगी केले.
संचालक डॉ. रणजित सपकाळ यांनी महाबीज जैविक उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करुन याचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी घ्यावा, असे सांगितले. याप्रसंगी सदर प्रक्षेत्रावर महाबीज वनौषधी उद्यानाचे उपस्थित मान्यवरांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाचे संचलन बीज परीक्षण अधिकारी राजेश पाटील यांनी केले तर आभारन जिल्हा व्यवस्थापक गणेश डहाळे यांनी मानले.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळांतर्गत महाबीज उत्कृष्ठता केंद्र, पैलपाडा येथे 57 एकर विस्तीर्ण प्रक्षेत्र आहे. रब्बी शिवार फेरीमध्ये महाबीज विपणन साखळी तसेच अधिक उत्पादनशील गहू ३३ वाण व हरभरा ३८ वाण या प्रमुख पिकांसह संकरीत ज्वारी, संकरीत मका, जवस, संकरीत बाजरी, सूर्यफुल व महाबीज संशोधीत भाजीपाला पिकांच्या नवीन वाणांचा समावेश आहे. महाबीजद्वारे आयोजित शिवार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेतकरी बांधवांना रब्बी, उन्हाळी पिकांच्या विविध वाणांचे गुणधर्म एकाच ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवता येत आहे.
या शिवार फेरीस जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भेट देऊन विविध रब्बी, उन्हाळी पिक, वाण व त्यांचे गुणधर्म, महाबीज जैविक उत्पादने, उती संवर्धीत केळी यासंदर्भातील बहुमोल माहिती व प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे आवाहन महाबीजद्वारे करण्यात आले आहे.