-डिफेन्स ते बर्डी दरम्यान इ-बस मधील प्रकार
नागपूर :-बस चालकावर क्वचितच जोरात ब्रेक दाबण्याची वेळ येते. प्रशिक्षित चालक प्रवाशांना त्रास होणार नाही, अशाच पध्दतीने वाहन चालवितो. मात्र, आपली बसच्या ताफ्यातील ईलेक्ट्रीक बसचे चालक अशा पध्दतीने ब्रेक लावतात की उभे असलेले प्रवासी पुढच्या प्रवाशांवर आदळतात तर बर्थवरील प्रवाशांचाही तोल जातो. असा प्रकार डिफेन्स ते सीताबर्डी या मार्गावर नेहमीच घडतो.
शहरातंर्गत वाहतुकीचे साधन म्हणून आपली बसला प्रवासी प्राधान्य देतात. खिशाला परवडनारा आणि वेळेची बचत होत असल्याने आपली बस प्रवाशांची पहिली पसंती आहे. अलिकडेच आपली बसच्या ताफ्यात ईलेक्ट्रीक बस आल्यात. स्मार्ट बस असल्याने प्रवाशांनाही आकर्षीत करते. डिफेन्स ते सीताबर्डी या मार्गावर चालणार्या ईबसने प्रवास करताना अचानक जोरात ब्रेक लावल्या जातो, असा अनुभव या मार्गाने नियमित प्रवास करणार्या विद्यार्थीनीला आला. ती दररोज या मार्गाने प्रवास करते. विशेष म्हणजे डिझेल बस पेक्षा ई बसमध्ये नेहमीच असा अनुभव येतो. याशिवाय इतरही जागरुक महिलांनी समस्या सांगितली.
रविवार 12 फेब्रुवारी रोजी एमएच40-सीएम-0561 या ई बसने फुटाळा ते सीताबर्डी असा प्रवास करीत असताना चालकाने येवढ्या जोरात बे्रक लावला की, उभ्याने प्रवास करणारे एकमेकांच्या अंगावर पडले तर सीटवरील प्रवाशांचाही तोल गेला. ही नित्याचीच बाब आहे. प्रवासी कधी मोबाईलमध्ये व्यस्त तर कधी चर्चेत असतात तर कधी कार्यालयीन कामाच्या विचारात असताना अचानक ब्रेक लागला की तोल जातो, या प्रकारामुळे कधी दुर्घघटना घडू शकते. याकडे जागरूक प्रवाशांनी लक्ष वेधले. वारंवार होत असलेल्या या प्रकारामुळे ई बसचे ब्रेक हाताळणे कठीण होत असावेत, किंवा आणखी काय तांत्रिक समस्या आहे, याचा शोध घेवून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी जागरूक प्रवाशांनी केली. यासंदर्भात आपली बस प्रशासनातील सागर पाध्ये यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेवून सोमवारी कळवतो असे ते म्हणाले.
@ फाईल फोटो