नागपूर : नागपूर जिल्हयामध्ये जी-20 परिषदेचे आयोजन 21 आणि 22 मार्चला करण्यात आले आहे. ‘नागपूर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया ‘ यासह जिल्हयातील विविध पर्यटन स्थळे, शहरात होत असलेली विकासकामे, ऐतिहासिक वास्तू, वारसा स्थळे, मंदिरे, जगभरात प्रसिद्ध नागपुरी खाद्यपदार्थ, नागपुरी भाषा, कलावंत, विचारवंत, नामवंत या संकल्पनेवर आधारित ही छायाचित्र स्पर्धा असणार आहे. जी-20 परिषदेच्या अनुषंगाने निघणाऱ्या कॅाफीटेबल बुक, ब्राऊचर्स, विविध नैमित्तिक प्रकाशने, होर्डिंग्स व फोटो प्रदर्शनामध्ये या छायाचित्रांचा समावेश करण्यात येणार आहे. पाच गटांमध्ये ही स्पर्धा होत आहे. विदर्भातील वाघांचे अस्तित्व व विदर्भातील जंगल (नागपूर; टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’), नागपूर हेरिटेज (हेरिटेज नागपूर), नागपुरातील सण, उत्सव, खानपान व परंपरा, नागपूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि नागपूर जिल्ह्यातील प्रेरणास्थळे या पाच गटासाठी प्रवेशिका पाठविण्याचे छायाचित्रकारांना आवाहन करण्यात आले आहे.
साध्या कागदावरील अर्जामध्ये छायाचित्राचे नाव व गट नमूद करणे आवश्यक आहे. यानिमित्ताने प्रकाशित होत असलेल्या कॉफी टेबल बुकमध्ये, शहरातील होर्डिंग, ब्रोश्चर्स, तसेच छायाचित्र प्रदर्शनामध्ये केला जाईल. छायाचित्रकारांना त्यासाठी क्रेडिट लाईन दिली जाईल. जी-20 निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर आपले योगदान देत आहेत. छायाचित्रकारांना देखील आपल्या कलेतून योगदान देता यावे यासाठी छायाचित्रकारांनी आपली उच्च दर्जाची (हाय रिझोल्युशन) टिपलेली छायाचित्रे जिल्हा माहिती कार्यालयाच्या dionagpur@gmail.com या ई मेलवर 3 मार्चपर्यंत पाठवावी, 5 मार्चला या संदर्भातील निकाल जाहीर करण्यात येईल.