मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी सर्व भारतीयांना खादीचा कपडा खरेदी करावा, असे आवाहन केले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने प्रधानमंत्री यांच्या आवाहनास अनुसरून मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात खादी महोत्सवाचे आयोजन केले आहे. आज २१ ऑगस्ट रोजी या महोत्सवाची सुरुवात झाली. २३ ऑगस्ट २०२४ रोजी या महोत्सवाचा समारोप होईल.
महाराष्ट्रातील खादी उत्पादकांचे एकूण १२ स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये विविध प्रकारचे कपडे, जॅकेट्स, साड्या, ड्रेस, मध अशा प्रकारचे अनेक स्टॉल्स आहेत. ग्रामोद्योग मंडळाच्या “हर घर खादी घर घर खादी” अन्वये आपल्या घरामध्ये अन्य कपड्यांबरोबरच खादीचा कपडा असावा, अशी घोषणा केली आहे. याची प्रत्येक भारतीयांनी दखल घेऊन खादीचा कपडा खरेदी करावा. रुमालापासून ते साडी पर्यंत काहीही खरेदी करावयाचे असल्यास ते खादीचे करावे, असे आवाहन खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी केले आहे.
या प्रदर्शनाला उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी भेट देऊन खादीच्या विविध स्टॉल्सची पाहणी केली. मंत्रालयीन अधिकारी तसेच कर्मचारी, नागरिकांनी खादी खरेदी करण्याचे आवाहन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्याच्या खादी मंडळाची ओळख मधुबन मधाने होते. मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणामध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी “हर घर खादी घर घर खादी. खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशन अॅण्ड खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन” असा मंत्र दिलाय. यासाठी प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकल्यास हे शक्य होऊ शकते. या महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आलेल्या इको फ्रेंडली गणपती मूर्ती यंदा आपल्या घरात विराजमान करावी. या महोत्सवासाठी ८०० मुलींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हाताने बनवलेले रुमाल आणि पंचे या स्टॉल्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उत्तरप्रदेश आणि आसाममधून काही लोक आले आहेत. विनोबा भावे यांची संस्था विनोबा ग्राम संघ, सेवाग्राम संस्थाकडून खादीच्या वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या महोत्सवाचा सर्वांनी आनंद घ्यावा, असे आवाहनही आर. विमला यांनी केले आहे.