मुंबई :- रसिकांच्या मनात रुंजी घालणारा गझलचा आवाज आज शांत झाला, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘चिठ्ठी आयी है..चिठ्ठी आयी…” या सदाबहार गझलच्या माध्यमातून पंकजजींनी रसिकांच्या मनांचा ठाव घेत, गझल गायनाच्या क्षेत्रात अधिराज्य गाजवले. गझलांमधील तरल भावनांना सुरेल आवाज देणारा हा कलावंत तितकाच विनम्र होता. त्यांच्या जाण्यामुळे भारतीय गझल गायकीला घरा-घरात आणि मना-मनात पोहचवणारा आवाज शांत झाला आहे. ते स्वररुपात अजरामर राहतील. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्र एका ज्येष्ठ मार्गदर्शकालाही मुकले आहे, असे शोकसंदेशात नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.