रामटेक :- दिनांक २३/०५/२०२४ रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजताच्या दरम्यान फिनिशिंग विभागातील स्टेन्टर मशिनला अचानक आग लागली. त्यामुळे फिनिशिंग विभागातील स्टेन्टर मशिन जळून त्या मशीनचे तसेच शेडचे अंदाजे २ कोटी रूपयांचे नुकसान झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंपनीने अग्निशमन दलास बोलावले होते. नगरपरीषद, रामटेक व नगरपरिषद कामठी यांनी अग्नीशमन वाहन ताबडतोब पाठविले व आग विझवण्यास मदत केली. दरम्यान कंपनीत उपलब्ध अग्नीशमन यंत्रांचे सहाय्याने तात्काळ कंपनीतील कर्मचारी, कामगार व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यास सुरवात केली. नगरपरीषद रामटेक अग्निशमनाचे वाहन रात्री ११.०० वाजता कंपनीत दाखल होवून संपूर्ण आग विझवून मध्यरात्री १२.०५ वाजता परत गेले. तर दुसरे अग्नीशमन वाहन रात्री ११.३० वाजता कंपनीत दाखल होऊन आग विझवून रात्री १२.०० वाजता परत गेले.
कंपनीतील कामगार, कर्मचारी, सुरक्षा रक्षक तसेच कंपनीत उपलब्ध अग्नीशमन यंत्र व फायर हायड्रंट तसेच उपरोक्त उल्लेखीत अग्नीशमन वाहन या सर्वांच्या सहकार्याने आगीवर सुमारे २ तासानंतर संपूर्ण नियत्रंण मिळविण्यास यश आले. तसेच मिलच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियत्रंण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न केले. आगीमुळे कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. परंतू कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.