मुंबई :- नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात ४४ गावांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात येते. सद्यस्थितीत टंचाई परिस्थितीत योजनेतून एकूण ६० गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. योजनेच्या माध्यमातून एकूण ६० गावांची पाणी मागणी ९.४५ दश लक्ष लिटर एवढी आहे. या योजनेद्वारे उपलब्ध होणारे पाणी व गळती याबाबत महिनाभरात पाण्याचे ऑडिट करण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
चांदवड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेबाबत सदस्य डॉ. राहुल आहेर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले, योजनेतील पाणीपुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत सुधारित योजनेचे काम सुरू आहे. योजनेचे काम विहित कालावधीत पूर्ण करावे. योजनेतील पाईप लाईनवर अनधिकृत, परवानगीपेक्षा जास्त जोडण्याची चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.