मुंबई :- विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान अर्धा तास चर्चा या आयुधाच्या माध्यमातून आमदार प्रवीण दटके यांनी नागपूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला .
मानकापूर परिसरात जिल्हा रुग्णालयाला वर्ष 2012 रोजी मंजुरी मिळाली.वर्ष 2018 ला हे रुग्णालय बांधण्यासाठी ची वर्क ऑर्डर देण्यात आली, आज 13 वर्षानंतरही अद्याप हे रुग्णालय कार्यान्वित झाले नाही ही गंभीर बाब आमदार दटके यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
या रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या पदनिर्मितीला शासनाने मंजुरी दिली आहे, परंतु प्रत्यक्ष पदभरती अजूनही झाली नाही. तसेच 113 प्रकारच्या मशिनरीच्या खरेदीची मंजुरी मिळाली असतानाही प्रत्यक्ष फक्त 22 मशीनची खरेदी झाली आहे.
लॉन्ड्री ,किचन अशा कामांसाठी आऊटसोर्सिंग करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे ,त्याचीही मंजुरी लवकर देण्यात यावी अशी मागणी आमदार प्रवीण दटके यांनी केली .
यावेळी दटके यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी येणाऱ्या 3 महिन्यात हॉस्पिटल सुरू करणार असल्याचे आश्वासित केले .तसेच माननीय आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समवेत जिल्हा रुग्णालय नागपूर येथे भेट देणार असल्याचे सभागृहाला आश्वासित केले.