राज्यात जानेवारी ते मे २०२३ अखेर ८८ हजार १०८ उमेदवारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर ८८ हजार १०८ नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. महारोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

मंत्री लोढा म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छुक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

विभागामार्फत राज्यात ऑनलाईन व ऑफलाईन रोजगार १०४ रोजगार मेऴाव्यांचे चांगल्या पद्धतीने आयोजन करता येत असून उद्योजकांसह नोकरीइच्छूक उमेदवारांचा मेऴाव्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे,तसेच ऑनलाईन व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशनही जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर २८८ समुदेशन सत्र आयोजित केले असून यामध्ये ८४ हजार ८९० उमेदवारांनी या सत्रांचा लाभ घेतला आहे अशी माहिती मंत्री लोढा यांनी दिली.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत १ लाख ४ हजार ६९५ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छुक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

मंत्री लोढा म्हणाले की, माहे जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर विभागाकडे ६१ लाख ०६ हजार ०५८ इतक्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात १० लाख ३७ हजार ७४७, नाशिक विभागात ९ लाख ४७ हजार ७८६, अमरावती विभागात ६ लाख ३५ हजार ९२०,औरंगाबाद विभागात १२ लाख ०५ हजार ६८७, नागपूर विभागात ८ लाख ५१ हजार ३०१ पुणे विभागात १४ लाख २७ हजार ६१७ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

माहे जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे यात मुंबई विभागात २३ हजार ६३४, नाशिक विभागात १४ हजार २११, अमरावती विभागात ३ हजार ३६७,औरंगाबाद विभागात १७ हजार ४५१, नागपूर विभागात १ हजार १६५ ,पुणे विभागात २८ हजार २८० बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

नोकरीइच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळाला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली भेट

Tue Jun 20 , 2023
मुंबई :- महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रशेखर आजाद नगर (भापरा) या हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या मध्य प्रदेशातील जन्मस्थळाला भेट दिली. “भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध तरुणांना एकत्र करुन क्रांतिकारक लढा देणाऱ्या आणि हौतात्म्य पत्करणाऱ्या चंद्रशेखर आजाद यांच्या स्वप्नातील सुराज्य साकारण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे”, अशा भावना यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. मंत्री मुनगंटीवार सध्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com