नवी दिल्ली :- नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित भव्य सोहोळ्यात, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज 45 वर्षांखालील प्रतिभावान वैज्ञानिकांना शांती स्वरुप भटनागर राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेखी संदेशाद्वारे शांती स्वरुप भटनागर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि सीएसआयआर संस्थेच्या 82 च्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेशी संबंधित प्रत्येकाचे अभीष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी पाठवलेला लेखी संदेश केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी सर्वांना वाचून दाखवला. कार्यातील व्यस्ततेमुळे पंतप्रधान या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजर राहू शकले नाहीत.
पंतप्रधानांनी या संदेशात, समाज, उद्योग क्षेत्र तसेच देशाची सेवा करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या, सीएसआयआर संस्थेचे कौतुक केले. सुगंधी द्रव्ये अभियान, फुलशेतीमधील भरारी,जम्मू-काश्मीरमध्ये लव्हेंडर वनस्पतीच्या लागवडीतून घडलेली जांभळी क्रांती, देशाच्या सीमावर्ती भागांमध्ये पोलादाच्या मळीपासून तयार केलेले रस्ते ही राष्ट्रीय अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी सीएसआयआर संस्थेने केलेल्या कार्यांची काही अशी उदाहरणे आहेत ज्यांचा उल्लेख पंतप्रधानांच्या संदेशात होता.
सीएसआयआर संस्थेचे अध्यक्ष देखील असलेल्या पंतप्रधानांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे की, वर्ष 2047 मध्ये आपण स्वातंत्र्याचा शतकमहोत्सव साजरा करणार आहोत, तेव्हा, आतापासून तोपर्यंतचा काळ ही आपल्यासाठी सशक्त, समावेशक आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीचे स्वप्न साकार करण्याची संधी आहे आणि याच संदर्भात सीएसआयआरसारख्या संस्थांच्या भूमिकेला अधिक समर्पकता प्राप्त होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सीएसआयआर ही चंद्रयान-3 मोहिमेमध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या संस्थांपैकी एक होती, त्यामुळे या संस्थेच्या 82 व्या वर्धापनदिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ते पुढे म्हणाले की, आपल्या देशाच्या अंतराळ आणि वैज्ञानिक परिसंस्थेच्या अविरत प्रयत्नांनी जगाला दाखवून दिले आहे की आमच्या आकांक्षा अवकाशापुरत्या मर्यादित नाहीत. वैज्ञानिकांना सर्व प्रकारच्या साधन संपत्तीचा पुरवठा करून तसेच चैतन्यमयी आणि अनुकूल संशोधन परिसंस्थेची जोपासना करून देखील आम्ही त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला पूरक ठरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहोत असे पंतप्रधानांनी या संदेशात नमूद केले आहे.
पंतप्रधान म्हणतात की आपला देश आणि देशवासीय यांना सदैव वैज्ञानिक दृष्टीकोन आणि चौकस बुद्धीचे वरदान मिळालेले आहे.आपले शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी केलेले संशोधन आणि नवोन्मेष, विशेषतः महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या कार्याचा वेग आणि प्रमाण यांनी संपूर्ण जगाला, वैश्विक हितासाठी कार्य करण्याच्या क्षमतेबद्दल खात्री दिली आहे असे त्यांनी सांगितले.
सीएसआयआरचे उपाध्यक्ष देखील असलेले केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी याप्रसंगी सांगितले की, देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र ज्या पद्धतीने वेगाने पुढे जात आहे त्यात मोठे बदल घडून येत आहेत. आणि हे बदल केवळ सामाजिक आर्थिक विकासाच्या राष्ट्रीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठीच नव्हे तर जगातील पटलावर स्थान निश्चित करण्यासाठी देखील सुसंघटीत होत आहे.
भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा.अजय कुमार सूद यांनी त्यांच्या भाषणात शांती स्वरूप भटनागर पुरस्कार आणि याच प्रकारचे विज्ञान क्षेत्रातील इतर पुरस्कार यांच्या सुसूत्रीकरणाबद्दल चर्चा केली. ते म्हणाले की हे पुरस्कार 11 मे रोजी म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिनी जाहीर होतील आणि त्यांचे वितरण, ज्या दिवशी विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला त्या दिवशी म्हणजे 23 ऑगस्टला वितरीत करण्यात येतील.