नवी दिल्ली :- केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज पंजाबमधील अमृतसर येथे उत्तर विभागीय परिषदेच्या 31 व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. पंजाब, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री, दिल्लीचे नायब राज्यपाल, जम्मू काश्मीर आणि लदाख , चंदीगढचे प्रशासक, सदस्य राज्यांचे वरिष्ठ मंत्री या बैठकीत सहभागी झाले होते.
गेल्या 5 वर्षांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, क्षेत्रीय परिषदांची भूमिका सल्लागार स्वरूपापासून ते कृती मंचापर्यंत बदलली आहे, असे अमित शहा यांनी सांगितले. देशाच्या सीमांचे रक्षण करणारे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ ) आणि लष्करातील बहुतांश कर्मचारी उत्तर क्षेत्रीय परिषदेच्या अंतर्गत असलेल्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून येतात, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अंमली पदार्थ आणि दहशतवादाविरोधात कारवाई करण्यात यशस्वी ठरले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे, लवकरच आपल्या देशाच्या सीमेवर ड्रोनविरोधी यंत्रणा तैनात केली जाईल, असे त्यांनी सांगितले. गृहमंत्र्यांनी उत्तर क्षेत्रीय परिषदेच्या सर्व सदस्य राज्यांना पाणी वाटपाशी संबंधित वाद खुल्या मनाने आणि परस्पर चर्चेने सोडवण्याची विनंती केली.
देशातील सहकार चळवळ, शालेय मुलांचे गळतीचे प्रमाण कमी करणे आणि कुपोषण या मुद्द्यांवर विशेष लक्ष देत हे प्रश्न एकत्रितपणे प्राधान्याने सोडवण्याचे आवाहन अमित शहा यांनी सर्व सदस्य राज्यांना केले. देशात एकही बालक कुपोषित राहू नये, शाळा गळतीचे प्रमाण कमी करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे सांगत सहकार चळवळीला चालना दिल्याने देशातील 60 कोटींहून अधिक लोकांना समृद्धीकडे नेण्यात मदत होईल, असे शहा यांनी सांगितले.