नागपूर :- मागील चार दिवसापासून विभागात सुरु असलेल्या अतिवृष्टी व पूरामुळे सुमारे ४० हजार १७१ हेक्टर क्षेत्रातील पीकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये ४३ तालुक्यातील सूमारे ४९ हजार ४३० बाधित शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.
विभागात शुक्रवार दिनांक १९ जुलै अतिवृष्टीला सुरवात झाली असून नदी व नाल्यांना आलेल्या पूरामुळेही शेतामध्ये पाणी शिरल्याने शेतपीकांचे नुकसान झाले आहे. कापूस, तुर, सोयाबिन, मिरची, भात, भाजिपाला आदी पिकांचा समावेश आहे.
नागपूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ६ हजार ७६३ क्षेत्रातील भात, कापूस, सोयाबिन, मिरची , भाजीपाला आदी पीकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रातील ६ हजार ६५० शेतकऱ्यांचा प्राथमिक अंदाजानुसार यामध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १२ तालुक्यातील ११ हजार २२९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये १५ हजार ५२५ बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यातील ८ हजार २७७ क्षेत्र बाधित असून यामध्ये ९ हजार ७८० शेतकऱ्यांचा समावेश आहे. गोंदिया जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ४८२ हेक्टर क्षेत्र, बाधित शेतकरी ८६५, भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ८ हजार ५७५ हेक्टर बाधित क्षेत्र १६ हजार ११० शेतकऱ्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्हयात पाच तालुक्यात ४ हजार ८३९ हेक्टर बाधित क्षेत्र असल्याचा प्राथमिक अंदाज विभागीय कृषी सहसंचालक यांनी व्यक्त केला आहे.
विभागात सरासरी पेक्षा ३४.३५ टक्के जास्त पाऊस
विभागात सतत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे सरासरी पेक्षा ४३.३५ टक्के जास्त पाऊस पडला आहे. विभागाची आजपर्यंतची पावसाची सरासरी ४६७.६ मि.मी. असून आजपर्यंत प्रत्यक्ष ६२८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आजच्या सरासरी पेक्षा १३४.३५ मि.मी.अधिकचा पाऊस पडाला आहे.
सरासरी पेक्षा जास्त पाऊस झालेल्या जिल्ह्यामध्ये वर्धा-52.79 टक्के, नागपूर-34.5 टक्के, भंडारा-26.2 टक्के, गोंदिया-16.7 टक्के, चंद्रपूर-45.83 टक्के आणि गडचिरोली-50.24 टक्के पाऊस झाला आहे.