नागपूर : मागील दोन वर्षातील कोरोना काळात नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य सेवक, आशा वर्कर्स, शिक्षक तसेच अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना योद्धा बनून कोव्हीड रुग्णांची सेवा केली. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (ता. ७) सतरंजीपुरा झोन मध्ये मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते या कोव्हीड योध्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त विजय हुमने, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहायक अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त घनशाम पंधरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दीपप्रज्वलन करून केली. यावेळी सतरंजीपुरा झोन मधील कोरोना काळात सतत रुग्णसेवेत कार्यरत असलेले युपीएचसी मधील ४० कर्मचारी, १०० आशा वर्कर्स, २० शिक्षक आणि झोन स्तरावरील ३५ कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक सतरंजीपुरा झोनच्या झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी माने यांनी केले. संचालन आनंद ठाकरे यांनी तर आभार डॉ. मीनाक्षी माने यांनी मानले.