– राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात
नागपूर :- लोकशाही शासन व्यवस्थेत मतदानाला अनन्य साधारण महत्व आहे. समाजातील सर्व घटकांना समान संधी या व्यवस्थेत मिळते. लोकशाही शासन व्यवस्थेत संविधान हे संचित असून निवडणूक प्रक्रिया महत्वाची आहे. मतदार नोंदणी आवश्यक असल्याने युवा मतदारांनी मतदार नोंदणी करावी व मताचे सामर्थ समजून घ्यावं, असे उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड यांनी सांगितले.
25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदान दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिविक्षाधीन भारतीय प्रशासकीय सेवेचे कुशल जैन होते तर उपजिल्हाधिकारी पियुष चिवंडे, माधुरी तिखे, दीपमाला चौरे, हरिष भामरे, तहसीलदार स्नेहलता पाटील, वैशाली पाटील, वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष संज दूबे, राजीव स्पोटर्स फाऊंडेशनचे समन्वयक संदीप धोटे यावेळी उपस्थित होते.
निवडणूक सुधारणासंदर्भात केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते भारत निवडणूक आयोगाने बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड 2023 सन्मानित केले असून नागपूरकरांसाठी अभिनंदनीय क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
युवा वर्गाने निवडणूकीबद्दल उदासिनता दूर सारुन मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मतदार नोंदणी करावी. त्यासोबतच ज्यांची अजूनही मतदार नोंदणी केली नाही त्यांनी नोंदणी करुन घेण्याचे आवाहन बोदवड यांनी केले.
मिशन युवा, मिशन युवा डिस्ट्रीक्शन सारखे मतदान वाढीसाठी प्रयत्न करुन जिल्ह्याने बहुमान मिळविला असून या यशात सर्वांचे योगदान असल्याचे उपजिल्हाधिकारी पियुष चिवंडे यांनी सांगितले. मुलभूत कर्तव्य या शिर्षाखाली मतदानाचा अधिकार आपणास मिळाला. सर्वांना मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे. मतदारांनी मतदान करणारचं असा दृढनिश्चय यावेळी करावा, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात तहसीलदार स्नेहलता पाटील यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. यावेळी दोन नवमतदारांना ईपिकचे वाटप करण्यात आले. निवडणूक पर्यवेक्षक व बिएलओ यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.