– शिवरायांच्या पुतळ्यावरून गलिच्छ राजकारण करणा-यांना जनता जागा दाखवेल
मुंबई :- निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून महाविकास आघाडी गलिच्छ राजकारण करत राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सोमवारी जोरदार हल्ला चढवला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी आ. राज पुरोहित, श्याम सावंत, प्रदेश प्रवक्ता ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. राज्यात अशांतता निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची छायाचित्रे जाणूनबुजून समाज माध्यमांवर प्रसारित करणा-या संजय राऊत यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी सूचनाही खा. राणे यांनी केली.
खा. राणे म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर माफी मागितली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी आणि त्याच ठिकाणी शिवरायांचा नवीन पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारतर्फे समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. विकासाच्या मार्गावर अव्वल ठरत असलेल्या महाराष्ट्रात या ना त्या प्रकारे जातीय तणाव निर्माण व्हावा, रस्त्यावरचा संघर्ष निर्माण व्हावा अशी परिस्थिती निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. सूज्ञ जनता हा मविआचा मनसुबा उधळून लावेल असा विश्वास ही खा. राणे यांनी व्यक्त केला.
मविआ च्या जोडे मारो आंदोलनाचा खरपूस समाचार घेताना खा. राणे यांनी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 2004 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते या घटनेची आठवण करून दिली. 2004 च्या आणि आजच्या जोडे मारो आंदोलनात जमीन आसमानाचा फरक असल्याचे सांगत खा. राणे म्हणाले की यावेळी उद्धव ठाकरेंच्या शेजारी जोडे मारो आंदोलनात काँग्रेस नेते उभे होते. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींबाबत मात्र उबाठा चकार शब्द उच्चारत नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार हे राज्यातील वातावरण पेटते रहावे यासाठी प्रयत्न करत आहेत, याबद्दल खा. राणे यांनी खंत व्यक्त केली. अनेक वर्षे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री पदी असूनही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शरद पवार यांनी काही केले नाही, असेही खा. राणे यांनी सांगितले.