मुंबई :- वाढत्या प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देणे गरजेचे आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षीची दिवाळी फटाकेमुक्त आणि दिवे लावून साजरी करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना केले.
मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांशी दीपावलीमध्ये फटाके न फोडण्याच्या अनुषंगाने जागृती करण्याबाबत संवाद साधला. या ऑनलाईन संवादास शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, मुंबई विभागातील सर्व शिक्षण निरीक्षक आणि शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, दिवाळी हा सण आनंदाचा आहे. हा सण हर्ष आणि उल्हासात साजरा करण्याबाबत शाळांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचे महत्व सांगण्यात यावे. ‘स्वच्छता मॉनिटर’ या कार्यक्रमामध्ये शाळांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून सांगावे. शाळांनी परसबाग निर्माण करून परसबागेची निगा कशी ठेवावी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्यात यासाठी शाळांनी विविध उपक्रम राबवावेत, अशी सूचना त्यांनी केली.
प्रधान सचिव देओल यांनीही सर्व मुख्याध्यापकांना शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त व प्रदूषणविरहीत दिवाळी साजरी करण्याबाबत मार्गदर्शन करावे, अशी सूचना केली. या संवादामध्ये उपस्थित मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी सध्या मुंबई शहर व उपनगरांमध्ये होत असलेल्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली.
विभागीय उपसंचालक संगवे यांनी या ऑनलाईन संवादास उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करून सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.