प्लास्टीक पन्नी वापरावर मनपाची कारवाई ; ५ किलो प्लास्टीक जप्त

चंद्रपूर २२ जुन    प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमाअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेने प्लास्टिक जप्ती मोहिमेअंतर्गत मनपाच्या तीनही झोननिहाय कारवाईत संयुक्तपणे मोहीम राबवून गोल बाजार परिसरातील व्यवसाय प्रतिष्ठाने, दुकाने यांची कसून तपासणी करण्यात आली.
या कारवाईत अंदाजे ५ किलोग्रॅम प्लास्टीक व तत्सम साहित्य जप्त करण्यात आले.प्लास्टीकचा दैनंदिन जीवनात वापर न करण्याबाबत सक्त ताकीद याप्रसंगी देण्यात आली तसेच बंदी असलेल्या प्लास्टीक बाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलैपासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन वापर करतांना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. एकल वापर प्लास्टीक बंदी लागू झाल्यानंतर महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा याचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाईल, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांचा कारावास अशी शिक्षा राहणार आहे.
आयुक्त राजेश मोहीते यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल व उपायुक्त अशोक गराटे यांच्या नेतृत्वात डॉ. अमोल शेळके यांच्या प्रत्यक्ष सहभागात स्वच्छता निरीक्षक संतोष गर्गेलवार,भूपेश गोठे, प्रदीप मडावी, उदय मैलारपवार, अनिरुद्ध राजूरकर, महेंद्र हजारे, अनिल ढवळे, प्रभाग शिपाई तसेच मनपा कामगार यांच्या उपस्थितीत संयुक्तपणे ही मोहीम राबविण्यात आली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!