Ø जिल्हाधिकारी,सहपोलीस आयुक्त आणि माहिती आयुक्तांची उपस्थिती
नागपूर :- महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीच्या दोन दिवसीय बैठकीस येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे आणि नागपूर खंडपिठाचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या उपस्थितीत आज प्रारंभ झाला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी होते. यावेळी माहिती संचालक तथा समितीचे सदस्य सचिव डॉ.राहुल तिडके, नागपूर विभागाचे माहिती संचालक हेमराज बागुल, मराठवाडा विभागाचे माहिती संचालक किशोर गांगुर्डे तसेच राज्य अधिस्वीकृती समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
डॉ. इटनकर यांनी प्रशासनातील कारकिर्दीत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीं सोबतच्या सौहार्दपूर्ण संवादाचे अनुभव कथन केले. तसेच, येत्या लोकसभा सार्वत्रित निवडणुकीत प्रसारमाध्यमांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. अश्वती दोरजे म्हणाल्या, पोलीस आणि पत्रकार हे जनतेला न्याय देण्याचे काम करतात. पोलीस गुन्ह्यातील सत्य शोधून काढतात तर पत्रकार हे सत्य जनतेसमोर मांडतात.राहुल पांडे यांनी सांगितले,पत्रकारांजवळ लेखनीचे शस्त्र असून त्याचा सुयोग्य उपयोग व्हावा. राज्य अधिस्वीकृती समितीने पात्र व योग्य पत्रकारांस अधिस्वीकृती पत्रिका देण्याची व याचा सुयोग्य वापर व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय संबोधनात यदू जोशी म्हणाले, माहितीच्या अधिकाराबाबत यशदा पुणे यांच्या मार्फत राज्यातील पत्रकारांना विभाग निहाय प्रशिक्षण देण्याबाबत पुढाकार घेण्यात येईल. तसेच, अधिस्वीकृती पत्रिका योग्य पत्रकारांना मिळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
हेमराज बागुल यांनी प्रास्ताविक केले, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. राहुल तिडके यांनी आभार मानले. नागपूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष रमेश कुळकर्णी आणि सदस्यही यावेळी उपस्थित होते.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर संचालक कार्यालयाच्यावतीने अधिस्वीकृती समितीच्या चौथ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या समितीचे राज्याच्या विविध विभागातील सदस्य, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सर्व विभागांचे संचालक, उपसंचालक या बैठकीसाठी उपस्थित असून ३ मार्च २०२४ पर्यंत ही बैठक चालणार आहे.