मुंबई :- देशातील नेत्रहीन, कर्णबधिर तसेच इतर दिव्यांग लोकांना समाजाकडून सहानुभूतीची नाही, तर सहकार्याची गरज असते. दिव्यांगांना ईश्वर मानून त्यांची सेवा करणे हे पुण्यकार्य आहे. प्रत्येक काम राज्य किंवा केंद्र शासनावर सोडून चालणार नाही, तर दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी समाजाचे योगदान आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
हेतू चॅरिटेबल ट्रस्ट, ‘सक्षम’ तसेच महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने मालाड मुंबई येथे दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित १५ व्या दिवाळी स्नेह संमेलनाचे उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. १५) करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
भारतीय संस्कृतीमध्ये सेवेला धर्म मानले गेले आहे – ‘सेवा परमो धर्म:’. मानवतेची सेवा हे ईश्वरी कार्य मानले गेले आहे असे सांगून आपण एक दुसऱ्याची मदत करू तेंव्हाच संपूर्ण समाजाचे कल्याण होईल असे राज्यपालांनी सांगितले.
आपल्याला संधी मिळाली तर आपण भावी जीवन दिव्यांगांसाठी कार्य करण्यासाठी समर्पित करू असे त्यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी हेतू चॅरिटेबल ट्रस्टला ५ लाख रुपयांची तसेच दिव्यांग व्यक्तींच्या वाद्यवृंदाला पन्नास हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना मिठाई व नोटबुक्सचे वाटप करण्यात आले तसेच संस्थेच्या आश्रयदात्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या.(नि.) कमलकिशोर तातेड, आयोगाचे सदस्य एम.ए.सईद, हेतू चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रिखबचंद जैन, जिओ संस्थेचे अध्यक्ष घेवरचंद बोहरा, धर्मेश मांडलिया आदी उपस्थित होते. यावेळी दिव्यांग व्यक्तींच्या ‘हेतू संगीत समूहा’तर्फे गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.