प्रतिनिधी :- राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी येथे दुपारी १२:३० वाजेदरम्यान इयत्ता पाचवीच्या वर्गखोलीत साप असल्याचे आढळून आल्याने भीतीपोटी साऱ्यांचाच गोधळ उडाला. यावेळी शिक्षक साक्षोधन कडबे यांनी आकाशझेपच्या पेंच निसर्ग मित्र मंडळाचे प्रमुख व सर्पमित्र अजय राऊत यांना भ्रमणध्वनी द्वारा सदर घटनेची माहिती देऊन शाळेत बोलावले. अवघ्या दहा मिनिटातच सर्पमित्र अजय राऊत यांनी नवेगाव खैरी येथिल शाळेत येऊन सापाला कोणतीही इजा होऊ न देता पकडले व नंतर पेंच गार्डन परिसरात नेऊन सुरक्षितरित्या त्याच्या मूळ अधिवासात सोडून दिले. “या सापाची शेपटी लांब आणि निमुळती असल्याने इंग्रजीत त्याला Bronze back tree snake (व्हिप स्नेक) असेही म्हणतात. नानेटी हा साप सु. १०० सेंमी. लांब असून शेपूट शरीराच्या एक-तृतीयांश लांब असते.” अशी माहिती देऊन मुलांच्या मनातील भीती दूर केली.
सर्पमित्र अजय राऊत व सर्पमित्र सेजल ढोरे द्वारा सापांच्या माध्यमातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी केले जात असलेल्या कार्याबद्दल मुख्याध्यापक सोनीराम धोटे यांनी अभिनंदन करत शाळेला अनेकदा निःशुल्क सेवा प्रदान करीत असल्याबद्दल आभार व्यक्त केले. ज्येष्ठ शिक्षक राजीव तांदूळकर, नीळकंठ पचारे, सतीश जुननकर, दिलीप पवार, तारा दलाल, अमित मेश्राम,अर्चना येरखेडे, शिपाई मोरेश्वर दुनेदार व बहुसंख्य विद्यार्थी हे प्रामुख्याने उपस्थित होते.